वरणगाव गोळीबार प्रकरणाचा छडा; हनी ट्रॅप रचून तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी दोन आरोपी अटकेत!
जुन्या मारहाणीचा सहा महिन्यांनंतर घेतला सूड; AI तंत्रज्ञानाद्वारे मुलीचा आवाज काढून बनावट इन्स्टाग्राम खात्यातून तरुणाला जाळ्यात ओढल्याचा तपासात उलगडा
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. सोशल मीडियावर मुलीच्या नावाने बनावट खाते तयार करून आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने आवाजाची नक्कल करून तरुणाला भेटायला बोलावण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास डिवरे (वय २७, दोघे रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१ नोव्हेंबर रोजी फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर सरफराज सय्यद (वय २८) या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत हल्ल्यामागील कटाचा उलगडा केला.
जुन्या मारहाणीचा अपमान; सहा महिन्यांनी सूड
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरमधील जुन्या वादातून झालेल्या मारहाणीचा अपमान आरोपींच्या मनात होता. त्याचाच बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कट रचल्याचा संशय आहे. यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने बनावट खाते तयार करण्यात आले.
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलीच्या आवाजाची नक्कल करून सरफराज सय्यद याच्याशी संपर्क साधण्यात आला. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वरणगाव येथे भेटण्यासाठी बोलावण्यात आले. सोशल मीडियावरील मैत्रीच्या आमिषामागे गुन्हेगारी कट असल्याची कल्पना नसल्याने तो या जाळ्यात अडकला, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
बनावट खाते डिलीट; सायबर तपासातून आरोपींचा माग
गोळीबाराच्या घटनेनंतर संबंधित बनावट इन्स्टाग्राम खाते अवघ्या ४५ मिनिटांत डिलीट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक आणि सायबर तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या तपासातून भूषण उर्फ बिस्ला सावळे आणि सिद्धार्थ डिवरे यांची नावे समोर आली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, संतोष पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.
वरणगाव गोळीबार प्रकरणातील या कारवाईमुळे जुन्या वादातून रचलेल्या कथित कटाचा उलगडा झाला आहे. आरोपींनी हा कट नेमका कसा रचला, गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र कुठून मिळवले आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
