Spread the love

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; चौथ्या टप्प्यात ३६८ कोटींचे वाटप!

परभणी जिल्ह्यातील ३४ हजार ७५४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा; चार टप्प्यांत १.१३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

परभणी | दि. ४ | प्रतिनिधी : Ramchandra Annadate

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ३४ हजार ७५४ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर चौथ्या टप्प्यात ३६८ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या चार टप्प्यांत आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ लाख १३ हजार ९७२ शेतकऱ्यांना १ हजार ४१ कोटी ७५ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

चौथ्या टप्प्यात ३४ हजार ७५४ शेतकऱ्यांना लाभ

योजनेच्या चौथ्या टप्प्यात ३४ हजार ७५४ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर ३६८ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले. यापूर्वीच्या तीन टप्प्यांत ७९ हजार २१८ शेतकऱ्यांना ६७२ कोटी ९१ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे चारही टप्प्यांतील लाभार्थ्यांची संख्या १ लाख १३ हजार ९७२ झाली आहे.

दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील बँकांनी १ लाख ६० हजार ७६९ थकीत कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८०९ शेतकरी पात्र ठरले आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

चौथ्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर जमा झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ दिला जात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version