Spread the love

दिवाळीच्या मुहूर्तावर महावितरणचा ग्राहकांना मोठा दिलासा! थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ

‘अभय योजना २०२६-२७’ आजपासून सुरू; एकरकमी भरणा करणाऱ्यांना २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत, ३४ लाखांहून अधिक ग्राहकांना लाभाची संधी

जळगाव ग्रामीण | शैलेश गुरव, प्रतिनिधी

दिवाळीच्या शुभपर्वाचे औचित्य साधत महावितरणने वीजग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. वीजबिलांची थकबाकी असल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी महावितरणने ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणारी ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाली असून, १५ जानेवारी २०२७ पर्यंत ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून थकबाकीच्या ओझ्याखाली असलेल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळण्यासह पुन्हा वीजजोडणी सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महावितरणच्या मुख्यालयात योजनेचा शुभारंभ

महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संचालक धनंजय औंढेकर (संचालन), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प) आणि राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित होते.

३४ लाखांहून अधिक ग्राहकांकडे ७,६५० कोटींची थकबाकी

३१ मार्च २०२६ पर्यंत कृषी व सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना वगळता घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर बिगरकृषी वर्गवारीतील १,८३५ उच्चदाब आणि ३४ लाख ८४ हजार ५१३ लघुदाब ग्राहकांकडे एकूण ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीतील २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहेत.

तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ करण्यात येणार आहे.

१५ डिसेंबरपर्यंत भरणा केल्यास ‘अर्ली बर्ड रिबेट’

योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना विशेष ‘अर्ली बर्ड रिबेट’ मिळणार आहे.

  • तीन वर्षांपर्यंत वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित असलेले लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहक : १० टक्के सवलत.

  • तीन वर्षांपेक्षा अधिक काळ वीजजोडणी खंडित असलेले लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहक : २० टक्के सवलत.

  • इतर लघुदाब ग्राहक : अनुक्रमे १० आणि २० टक्के सवलत.

  • उच्चदाब ग्राहक : अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत.

हप्त्याने थकबाकी भरण्याचीही सुविधा

ग्राहकांना मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्याने भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम सुरुवातीला भरून उर्वरित रक्कम सहा समान, व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येणार आहे. उच्चदाब ग्राहकांना थकबाकीच्या रकमेप्रमाणे तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.

याशिवाय, मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. पुनर्जोडणी शुल्क तसेच लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

ऑनलाइन पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे अर्जाची सुविधा

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर बिगरकृषी ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, शेती आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पात्र ग्राहकांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल तसेच मोबाईल अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे.

थकबाकीमुळे अनेक वर्षांपासून वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांसाठी पुन्हा वीजजोडणी मिळविण्याची आणि आर्थिक ओझ्यातून मुक्त होण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी ‘अभय योजना २०२६-२७’चा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version