चोरीच्या तक्रारीसाठी ज्येष्ठ दाम्पत्याच्या दीड वर्षांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या!
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही दखल घेतली नसल्याचा आरोप; उमरगा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
उमरगा/धाराशिव | प्रशांत लक्ष्मण ढोणे
घरात झालेल्या चोरीची तक्रार नोंदवून न्याय मिळावा, यासाठी कुन्हाळी येथील ज्येष्ठ नागरिक माधव सिद्धू ढोणे आणि त्यांच्या पत्नी कलावती ढोणे हे गेल्या दीड वर्षांपासून उमरगा पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही सुरुवातीला गुन्हा दाखल झाला नाही आणि नंतर दाखल केलेल्या फिर्यादीतही चोरीच्या मुद्देमालाची योग्य नोंद, घटनास्थळाचा पंचनामा तसेच एफआयआरची प्रत देण्यात आली नसल्याचा आरोप या दाम्पत्याने केला आहे. या प्रकरणामुळे उमरगा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पत्नीच्या उपचारांसाठी जमवलेली रक्कम आणि दागिने चोरीला
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कुन्हाळी हे तीन ते चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील रहिवासी माधव सिद्धू ढोणे आणि त्यांच्या पत्नी कलावती ढोणे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. कष्टातून मिळालेल्या पैशांची बचत ते बचत गट आणि पोस्टाच्या माध्यमातून करत होते.
कलावती ढोणे आजारी असल्याने त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी जमा केलेली रक्कम पोस्ट आणि बचत गटातून काढून दवाखान्यात जमा करण्याच्या उद्देशाने घरी आणून ठेवण्यात आली होती. मात्र, ९ मार्च २०२५ रोजी त्यांच्या घरात चोरी झाली. या चोरीत ८५ हजार रुपये रोख आणि सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे माधव ढोणे यांचे म्हणणे आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी सुरुवातीपासून टाळाटाळ?
चोरीची तक्रार देण्यासाठी माधव ढोणे उमरगा पोलीस ठाण्यात गेले असता, ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी विष्णू मुंढे यांनी घरी येऊन पंचनामा करण्याचे सांगून त्यांना परत पाठविल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी आले; मात्र कोणताही पंचनामा न करता परत गेल्याचे ढोणे यांनी सांगितले.
यानंतर माधव ढोणे यांनी वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याची मागणी केली. मात्र, चौकशी सुरू असल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अश्विनी भोसले यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला; परंतु भेट होऊ दिली नाही. उलट दमदाटी करून परत पाठविल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही तक्रारीची दखल नसल्याचा आरोप
२० जून २०२५ रोजी माधव ढोणे यांनी धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार कथन केला. यावेळी तक्रार दाखल करून नियमानुसार चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ढोणे यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही उमरगा पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस ठाणे प्रभारी अश्विनी भोसले यांची पुन्हा भेट घेऊन पोलीस अधीक्षकांनी तक्रार घेण्यास सांगितले असतानाही आपली तक्रार का नोंदवली जात नाही, असा जाब विचारल्याचे माधव ढोणे यांनी सांगितले. मात्र, त्यावेळीही समाधानकारक सहकार्य मिळाले नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
१६ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद; मात्र तपास प्रक्रियेवर आक्षेप
सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर १६ ऑगस्ट २०२५ रोजी आपली फिर्याद नोंदवून घेण्यात आल्याचे माधव ढोणे यांनी सांगितले. मात्र, फिर्याद नोंदविताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, चोरीस गेलेल्या मुद्देमालाची योग्य नोंद करण्यात आली नाही, एफआयआरची प्रत देण्यात आली नाही तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला नसल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचारी विष्णू मुंढे, तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अश्विनी भोसले आणि कुन्हाळी येथील पोलीस पाटील यांनी आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली नसल्याचा आरोप ज्येष्ठ दाम्पत्याने केला आहे.
मानसिक त्रासामुळे उपचार सुरू; पोलीस प्राधिकरणाकडेही तक्रार
दीर्घकाळ न्यायासाठी पाठपुरावा करावा लागत असल्याने माधव ढोणे आणि त्यांच्या पत्नी कलावती ढोणे यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी माधव ढोणे यांनी पोलीस प्राधिकरणाकडेही तक्रार केल्याचे सांगितले आहे.
आपल्याला न्याय मिळावा, चोरीच्या घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा आणि संबंधित जबाबदार व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी या ज्येष्ठ दाम्पत्याने केली आहे. भविष्यात आपल्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास त्याला संबंधित जबाबदार व्यक्ती जबाबदार असतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दीड वर्षांपासून न्यायासाठी सुरू असलेला हा पाठपुरावा पाहता, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. या प्रकरणातील आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
