दिवाळीनिमित्त महावितरणची वीजचोरीविरोधात जनजागृती मोहीम!
नशिराबादमध्ये मोटारसायकलवर लाऊडस्पीकर लावून दवंडी; वीजचोरी करणाऱ्यांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईचा इशारा
नशिराबाद | शैलेश गुरव – जळगाव ग्रामीण प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वीजचोरीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये कायदेशीर व अधिकृत वीजवापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महावितरणच्या नशिराबाद शहर कक्षातर्फे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मोटारसायकलवर लाऊडस्पीकर लावून गावातील विविध भागांत दवंडी देत ग्रामस्थांना वीजचोरी न करण्याचे आवाहन करण्यात आले.
दवंडीद्वारे ग्रामस्थांना कायद्याची माहिती
या जनजागृती मोहिमेत वीजचोरीचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर तरतुदी आणि होणाऱ्या कारवाईबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. अनधिकृतपणे वीज वापरणे किंवा वीजजोडणीमध्ये बेकायदेशीर बदल करून वीजचोरी करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारात कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशारा ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आला.
अधिकृत वीजवापराचे आवाहन
महावितरणचे सहाय्यक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीच्या काळात वीजचोरीसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, अधिकृत वीजवापराला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
ग्रामस्थांनी अधिकृत वीजजोडणीद्वारेच विजेचा वापर करावा, नियमित वीजबिल भरावे आणि वीजचोरीमुक्त नशिराबाद गाव निर्माण करण्यासाठी महावितरण प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
‘वीजचोरी टाळा, कायदेशीर अडचणी टाळा! वीजचोरीमुक्त नशिराबाद गावासाठी सहकार्य करा!’ असा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला.
— महावितरण, नशिराबाद शहर कक्ष
