सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा धडाका; दीड कोटींचे अन्नपदार्थ जप्त!
एफडीएकडून दोन महिन्यांत २७ ठिकाणी छापे; १७ परवाने निलंबित, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १३९ नमुने तपासणीसाठी संकलित
धुळे | प्रतिनिधी
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडाकेबाज कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यांत विविध ठिकाणी २७ छापे टाकून तब्बल १ कोटी ५५ लाख रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम
दिवाळी सणाच्या काळात मिठाई, फराळ, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी एफडीएकडून १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण १३९ अन्न नमुने विश्लेषणासाठी संकलित करण्यात आले.
खाद्यतेलापासून मिठाईपर्यंत नमुन्यांची तपासणी
तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये खाद्यतेल, स्पेशल बर्फी, सोनपापडी, फरसाण, मिरची पावडर, हळद पावडर यांसह विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. या नमुन्यांचे विश्लेषण करून अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे.
विक्रेत्यांना परवाना घेण्याचे आवाहन
दिवाळीच्या काळात चकली, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे यांसारख्या फराळाच्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी आवश्यक अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी अन्नपदार्थ विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, तसेच नागरिकांनीही खरेदी करताना अन्नपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
