थोरगव्हाण ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ‘बंपर बोनस’!
एक महिन्याचा पगार, नवीन कपडे आणि मिठाईचे बॉक्स देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान; जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा आदर्श
थोरगव्हाण (ता. रावेर, जि. जळगाव) | संघरत्न सपकाळे, भुसावळ
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! याच आनंदात आपल्या कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेत थोरगव्हाण ग्रामपंचायतीने एक कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. दिवाळीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात आला. यासोबतच नवीन कपडे आणि मिठाईचे बॉक्स देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा शालिक तायडे आणि ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम, नवीन कपडे आणि मिठाईचे बॉक्स वितरित करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची घेतली दखल
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. गावातील स्वच्छता राखणे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे आणि गावाच्या विकासकामांना हातभार लावणे, अशा अनेक जबाबदाऱ्या ते पार पाडतात.
या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेत त्यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याच्या भावनेतून ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा आदर्श!
थोरगव्हाण ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ दिवाळी भेट देण्यापुरता मर्यादित नसून कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करणारा सकारात्मक संदेश देणारा आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही थोरगव्हाणचा आदर्श घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या कामाची योग्य दखल घेत त्यांना प्रोत्साहन आणि सन्मान दिल्यास त्यांच्या कामातील उत्साह निश्चितच वाढू शकतो. गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची कदर झाली पाहिजे, हाच संदेश थोरगव्हाण ग्रामपंचायतीने आपल्या कृतीतून दिला आहे.
याप्रसंगी उपसरपंच नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य धीरज चौधरी, सतीश चौधरी आदी उपस्थित होते.
