Spread the love

भल्या पहाटे लक्झरी बसमध्ये महिलेचा विनयभंग; डायल ११२ च्या एका कॉलवर आरोपी गजाआड!

सोनगीर पोलिसांची सुपरफास्ट कारवाई; अवघ्या नऊ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल, मध्यप्रदेशातील सहचालक ताब्यात

धुळे | प्रतिनिधी

ठाण्याहून भोपाळच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसमध्ये प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा बसच्या सहचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने प्रसंगावधान राखत डायल ११२ वर संपर्क साधला. मदतीसाठी कॉल मिळताच सोनगीर पोलिसांनी तातडीने हालचाल करत सोनगीर टोलनाक्याजवळ बस अडवली आणि संशयित सहचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या नऊ तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सोनगीर पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे कौतुक होत आहे.

झोपेत असताना सहचालकाचे गैरवर्तन

मिळालेल्या माहितीनुसार, वर्मा कंपनीच्या लक्झरी बसमधून एक २५ वर्षीय महिला आपल्या बहिणीसह प्रवास करत होती. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास महिला आपल्या सीटवर झोपलेली असताना बसच्या सहचालकाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. इतर प्रवाशांच्या मदतीने तिने तातडीने डायल ११२ वर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली.

डायल ११२ चा कॉल अन् पोलिसांची तातडीची धाव

महिलेचा मदतीसाठी कॉल प्राप्त होताच सोनगीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोनगीर टोलनाक्याच्या पुढे लक्झरी बस अडवून पोलिसांनी ती पोलीस ठाण्यात आणली. यावेळी जावेद खान गुलाब खान मंसूरी (वय ४१, रा. विदिशा, मध्यप्रदेश) या सहचालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात संबंधित गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

अवघ्या नऊ तासांत दोषारोपपत्र दाखल

या प्रकरणात पीडित महिला आणि इतर प्रवाशांचे जबाब नोंदवून सोनगीर पोलिसांनी तपासाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. घटनेनंतर अवघ्या नऊ तासांत संशयित आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने प्रतिसाद देत केलेल्या या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस अंमलदार तुषार मोरे आणि रोहन वाघ यांनी ही कारवाई केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version