Spread the love

ऊसतोड मजुरांच्या पालावर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची दिवाळी!

परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० शेतकऱ्यांच्या खात्यात १६८ कोटी १९ लाखांची अग्रीम मदत जमा; मजुरांच्या चिमुकल्यांना स्वतःच्या हाताने घातले नवे कपडे

परभणी, दि. ८ | प्रतिनिधी – रामचंद्र अन्नदाते

ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे परिसरातील ऊसतोड मजुरांची भेट घेतली. यावेळी मजुरांच्या लहान मुलांना स्वतःच्या हाताने नवीन कपडे घालून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, शासनाच्या दिवाळी अग्रीम मदतीअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १६८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.

मजुरांच्या पालावर फुलविला दिवाळीचा आनंद

दिवाळीचा सण सर्वांसाठी आनंदाचा असला, तरी ऊसतोडीसाठी गावोगावी स्थलांतर करणाऱ्या मजुरांना अनेकदा आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करता येत नाही. रोजीरोटीसाठी घरदार सोडून पालावर राहणाऱ्या या कष्टकरी कुटुंबांच्या आनंदात सहभागी होण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आडगाव दराडे परिसरातील ऊसतोड मजुरांच्या पालावर भेट दिली.

यावेळी त्यांनी मजुरांच्या चिमुकल्यांना स्वतःच्या हाताने नवीन कपडे घातले, दिवाळी फराळाचे वाटप केले आणि कुटुंबीयांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्यांच्या उपस्थितीत या कष्टकरी कुटुंबांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला.

‘कष्टकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे’

ऊसतोड कामगार आणि शेतकरी कुटुंबांना आपण एकटे नसून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, याची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी करताना ही कुटुंबे आपलीच आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यातच खऱ्या सणाचा आनंद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६८ कोटींची दिवाळी अग्रीम मदत

दुसरीकडे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ४ हजार ३७२ कोटी रुपयांहून अधिक निधी जमा करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० पात्र शेतकऱ्यांना एकूण १६८ कोटी १९ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यांत वितरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील होत्या.

कष्टकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद

एकीकडे ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यांत आर्थिक मदत जमा होणे, या दोन्ही उपक्रमांमुळे परभणी जिल्ह्यातील कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version