वाचनालयातून विचार समृद्ध होतात; ग्रामीण भागात ग्रंथालयांची निर्मिती काळाची गरज!
उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांचे प्रतिपादन; मारवड येथे ‘त्रिरत्न मोफत वाचनालय’चे उद्घाटन
मारवड | प्रतिनिधी :
वाचनालय हे केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नसून विचारांना व्यापकता देणारे आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे ज्ञानकेंद्र आहे. नालंदासारख्या ऐतिहासिक विद्यापीठांचा आदर्श आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील वस्ती-वाड्यांमध्ये वाचनालयांची निर्मिती करणे म्हणजे पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाचनालयातून विचारांची समृद्धी आणि व्यापकता दृढ होत असते, असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले.
मारवड येथे विश्वशांती बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या वतीने ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘त्रिरत्न मोफत वाचनालय’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात भंते संघक्षित आणि भंते संघनाग यांच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली. यावेळी डॉ. साळवे यांनी ऐतिहासिक नालंदा विद्यापीठासह प्राचीन विद्यापीठांच्या ज्ञानपरंपरेचा संदर्भ देत वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनालये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके आणि अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाचनालयाची सुविधा
या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना शांत आणि अनुकूल वातावरणात वाचन व अभ्यास करता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे खुली करून देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि स्वागत
कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या सदस्या रिता बाविस्कर, दलित पँथरचे अध्यक्ष चेतनभाऊ नन्नवरे, डॉ. मिलिंद बागुल, बापू पानपाटील, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटनेचे पालक अध्यक्ष आर. टी. सोनवणे, डॉ. बापू शिरसाठ, सुनील सोनवणे, रवींद्र वानखेडे, विजय वानखेडे, आप्पा दाभाडे, कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, अतुल डोळस, शांताराम साळुंखे, राकेश मुंदडे, शरद वामन पाटील, विलास सोनवणे, उमाकांत पाटील, गंगुबाई पानपाटील, छायाबाई पानपाटील आणि हरिभाऊ वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विनोद पानपाटील, प्रवीण बैसाणे, दीपिका पानपाटील, विजय पानपाटील, शांताबाई पानपाटील आणि योगेश पानपाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले हे मोफत वाचनालय ज्ञान, वाचनसंस्कृती आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणारे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
