Spread the love

शासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’!

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर आंदोलन; शेतकऱ्यांना एक लाखांची मदत देण्याची मागणी

धुळे | प्रतिनिधी

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सोबत आणलेली चटणी-भाकर खाऊन राज्य शासनाचा निषेध नोंदविला. तसेच शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची?

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून तिचे वितरण सुरू केले आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करावी, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. संकटाच्या काळात शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकरी वर्गाला शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून शासनाच्या अल्प आर्थिक मदतीचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.

वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, प्रभारी जिल्हाध्यक्ष चंद्रमणी वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत वाघ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खेरनार, सिताराम वाघ, बी. टी. अहिरे, किरण मोरे, मुकुंद माणिक, आकाश बागुल, दिलीप बोरसे, नितीन मोहिते, दीपक सोनवणे, अमोल पवार, अर्जुन वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version