Spread the love

शेतातील पाणी काढण्यावरून शेतकऱ्याला पिता-पुत्राची बेदम मारहाण; शरीरात नऊ ठिकाणी फ्रॅक्चर!

नगावमधील घटनेने खळबळ; संशयित पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल, कठोर कारवाईसाठी शेकडो ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

धुळे : प्रतिनिधी

शेतातील पाणी काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नगाव येथे एका शेतकऱ्याला पिता-पुत्राने कथितरीत्या रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या मारहाणीत बापू संतोष पाटील हे शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या शरीराला तब्बल नऊ ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सचिन मेघराज पाटील आणि मेघराज पाटील या पिता-पुत्रांविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले.

शेतातील पाण्यावरून वादाचे रूपांतर मारहाणीत

मिळालेल्या माहितीनुसार, बापू संतोष पाटील हे नगाव येथील स्वतःच्या शेतात पाणी भरत असताना काल सायंकाळी सचिन मेघराज पाटील आणि मेघराज पाटील या पिता-पुत्रांशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. यावेळी दोघांनी रॉड आणि लाकडी दांडक्याने बापू पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीराला नऊ ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे.

कठोर कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले

या घटनेची गंभीरता लक्षात घेता नगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. संबंधित पिता-पुत्रांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब संतोष पाटील, समाधान पाटील, रामकृष्ण पाटील, हिरालाल पाटील, दीपक पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील, बंटी पवार, गटलू पाटील, जगदीश पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, अमोल पाटील, राकेश पाटील, भटू पाटील यांच्यासह संध्या पाटील, उषाबाई पाटील, अलका पाटील, सुनंदा पाटील, रेखा पाटील, मीना पाटील, संगीता पाटील, सोनाली पाटील, अंजना पाटील तसेच नगावचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version