Spread the love

स्पर्धा परीक्षार्थींना सोशल मीडियावर मिळणार मोफत मार्गदर्शन!

प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे यांचा पुढाकार; ‘संविधानाची तोंडओळख’ उपक्रमातून राज्यघटना, GK आणि GS चे धडे

मुखेड : प्रतिनिधी

आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांचे महागडे मार्गदर्शन घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांनाही अधिकारी होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे ऊर्फ एस. एन. नांदेडकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम हाती घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७ नोव्हेंबर या शाळा प्रवेश दिनानिमित्त साजरा होणाऱ्या विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

‘संविधानाची तोंडओळख’ उपक्रमाला सुरुवात

१ नोव्हेंबरपासून ‘संविधानाची तोंडओळख’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेची मूलभूत माहिती, महत्त्वाची कलमे, घटनात्मक तरतुदी, सामान्य ज्ञान (GK) आणि सामान्य अध्ययन (GS) या विषयांचे मोफत मार्गदर्शन केले जात आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर मार्गदर्शन

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील ‘Sanghshil Bhadre’ व ‘SN Nandedkar Master’ या अकाउंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचा अनुभव असलेल्या भद्रे यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ज्ञान राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य पोहोचविण्याचा निर्धार केला आहे.

ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी

ग्रामीण भागातील, वाडी-वस्ती-तांड्यांवरील तसेच विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा लाभ होऊ शकतो. महागड्या क्लासेसचे शुल्क परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अडथळे येतात. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, हा या मोफत मार्गदर्शनामागील मुख्य हेतू असल्याचे संघशिल भद्रे यांनी सांगितले.

इच्छुक विद्यार्थ्यांनी या मोफत मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षांसंदर्भात अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी ९८८११ २७००३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघशिल भद्रे ऊर्फ एस. एन. नांदेडकर सर यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version