Spread the love

रिक्षात विसरलेली दीड लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी महिलेला केली परत!

आझादनगर पोलिसांची सुपरफास्ट कामगिरी; अवघ्या काही तासांत रिक्षाचा शोध घेऊन मिळवून दिला हरवलेला ऐवज

धुळे : प्रतिनिधी

रिक्षातून प्रवास करताना सोन्याच्या दागिन्यांची बॅग विसरलेल्या महिलेला आझादनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संबंधित रिक्षाचा शोध घेऊन सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने महिलेला परत मिळवून दिले. आझादनगर पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रिक्षातून उतरताना दागिन्यांची बॅग विसरल्या

संगीता वर्मा या आपल्या दोन्ही मुलींसह फुले कॉलनी येथून रिक्षाने घराकडे जात होत्या. जलाराम बाप्पा मंदिराजवळील महालक्ष्मी कॉलनी येथे त्या रिक्षातून उतरल्या. मात्र, घरी पोहोचल्यानंतर सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने आझादनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली.

पोलीस निरीक्षकांचे तातडीने शोधाचे आदेश

महिलेची तक्रार समजताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी संबंधित रिक्षाचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अंमलदार गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, मनोज बागुल, अनिल शिंपी आणि पंकज जोंधळे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत संबंधित रिक्षाचा शोध घेतला आणि त्यातील विसरलेली दागिन्यांची बॅग सुरक्षितपणे मिळवली. त्यानंतर सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने संगीता वर्मा यांना परत करण्यात आले.

आझादनगर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

हरवलेला ऐवज अल्पावधीत परत मिळाल्याने संगीता वर्मा यांनी पोलिसांचे आभार मानले. नागरिकांच्या तक्रारीला तातडीने प्रतिसाद देत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आझादनगर पोलीस ठाण्याच्या पथकाचे कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version