Spread the love

इच्छापूर्ती गणपतीचा चोरी गेलेला चांदीचा मुकुट जप्त; एकास अटक

सोयगाव पोलिसांची चार दिवसांत यशस्वी कामगिरी; सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक

सोयगाव (प्रतिनिधी – शिवराम जाधव) : वेताळवाडी–हळदा घाटातील प्रसिद्ध इच्छापूर्ती गणपती मंदिरातून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट सोयगाव पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत शोधून जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली. जप्त केलेल्या मुकुटाची किंमत २१ हजार रुपये असून त्याचे वजन ७.५ भार आहे.

मंदिरातून मुकुट चोरीला

दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने इच्छापूर्ती गणपती मंदिरातील गणपती मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरून नेला होता. याप्रकरणी कृष्णा शहाजी भोसले (वय ४६, रा. हळदा, ता. सोयगाव) यांनी ५ नोव्हेंबर रोजी सोयगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २५०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीने तपासाला दिशा

उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनकर एस. गोरे यांनी तपासासाठी पथक तयार केले. पथकाने मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

२१ हजारांचा चांदीचा मुकुट हस्तगत

या प्रकरणी आकाश पुंडलिक जाधव (वय ३२, रा. हळदा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला ९ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेला ७.५ भार वजनाचा आणि अंदाजे २१ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट जप्त करण्यात आला. या मुकुटाच्या मध्यभागी लाल रंगाचा खडा असून त्यावर शेंदूर लागलेला आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दिनकर एस. गोरे यांच्या नेतृत्वाखाली सफौ इसरार मिझाँ, पोहेकॉ ज्ञानेश्वर दांडगे, पोहेकॉ नारायण जिरी, पोअं गजानन दांडगे, पोअं सादिक तडवी, पोअं राजेंद्र सोनवणे, पोअं शांताराम सपकाळ, पोअं पवन तायडे आणि पोअं कुणाल जाधव यांनी केली. पुढील तपास सोयगाव पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version