Spread the love

१०८ वर्षांची परंपरा! येवतीत शुक्रवारी साजरी होणार ‘करदोडा दिवाळी’

अंबऋषी महाराजांच्या दर्शनासाठी माहेरवाशिणींसह भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात निघणार भव्य मिरवणूक

बोदवड : प्रतिनिधी – सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील येवती येथे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेला १०८ वर्षांची परंपरा लाभलेला ऐतिहासिक ‘करदोडा दिवाळी’ उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अंबऋषी महाराजांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेतून जपली गेलेली ही परंपरा आजही ग्रामस्थ भक्तिभावाने पुढे नेत आहेत. उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

नामदेव बळीराम माळी यांच्या शेतातील अंबऋषी महाराजांच्या मंदिरात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे.

ढोल-ताशांच्या गजरात निघणार मिरवणूक

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता माळी वाड्यापासून अंबऋषी महाराजांच्या मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महिला, पुरुष आणि भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर अंबऋषी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येईल. त्यानंतर महिलांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला करदोडा बांधण्याचा धार्मिक विधी पार पडेल. सामूहिक आरती आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर मंदिर परिसरासह संपूर्ण गावात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी साजरी केली जाणार आहे.

दीडशे वर्षांपूर्वीच्या आख्यायिकेशी जोडली श्रद्धा

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सांगण्यानुसार, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी येवती परिसरात त्वचेच्या एका असाध्य आजाराने थैमान घातले होते. या आजारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यावेळी गावालगतच्या एका झोपडीत अंबऋषी महाराज वास्तव्यास होते. महाराजांच्या आशीर्वादामुळे ग्रामस्थांना या आजारातून मुक्ती मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून ग्रामस्थांनी महाराजांची सेवा आणि पूजा करण्यास सुरुवात केली.

मात्र, दिवाळीच्या दिवशीच अंबऋषी महाराजांचे निधन झाल्यामुळे येवती आणि रेवती येथील ग्रामस्थ दिवाळीच्या दिवशी उत्सव साजरा करत नाहीत. भाऊबीजेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी किंवा शुक्रवारी करदोडा दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. आजही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने जपली जात असून, यंदा या परंपरेला १०८ वर्षे पूर्ण होत आहेत.

माहेरवाशिणींच्या आगमनाने गावात उत्साह

या उत्सवासाठी नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थ तसेच माहेरवाशिणी महिलांचे येवतीत आगमन सुरू झाले आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आले असून, परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. मंदिर परिसरही आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी ढोल-ताशांचा निनाद, दिव्यांची रोषणाई, सामूहिक आरती आणि करदोडा बांधण्याच्या धार्मिक विधीने येवती गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक ठरलेली ही अनोखी करदोडा दिवाळी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामस्थांकडून सातत्याने केले जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version