Spread the love

फक्त पुस्तकी किडा नको, मैदानावरील योद्धा घडवा!

महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देण्याची वेळ; गुणांच्या शर्यतीसोबतच आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासालाही महत्त्व द्या!

लेखक : स्वप्नील चंद्रकांत साळुंके
क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडा संकुल, मलकापूर

छत्रपती शिवरायांचा शौर्यशाली वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात खेळ ही केवळ करमणुकीची बाब नाही, तर चारित्र्य घडवणारी, आत्मविश्वास वाढवणारी आणि उज्ज्वल भविष्याचा पाया रचणारी जीवनशैली आहे. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण अभ्यास, शिकवण्या आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकत चालले आहे. अशा परिस्थितीत मुलांना पुन्हा मैदानाकडे वळविण्याची गरज निर्माण झाली आहे.

शाळेतून घरी आल्यानंतर शिकवणी वर्ग, त्यानंतर गृहपाठाचा डोंगर आणि उरलेल्या वेळेत हातात मोबाईल किंवा स्क्रीनचा झगमगाट! आज बहुतांश मुलांचे बालपण अशाच चौकटीत अडकलेले दिसते. पालकांच्या मनात आपल्या पाल्याने परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, गुणांच्या या स्पर्धेत आपण नकळत मुलांचे खेळण्याचे स्वातंत्र्य आणि मैदानाशी असलेले नाते हिरावून घेत आहोत का? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

खेळ आणि बुद्धिमत्ता : विज्ञानाने अधोरेखित केलेले महत्त्व

अनेक पालकांचा असा समज असतो की, मुलांनी खेळात अधिक वेळ घालवला तर त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. परंतु नियमित शारीरिक हालचालींचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर, स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर सकारात्मक परिणाम होतो, हे विविध संशोधनांतून अधोरेखित झाले आहे.

मैदानावर धावणारे, उड्या मारणारे, प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींचा अंदाज घेणारे आणि क्षणार्धात निर्णय घेणारे विद्यार्थी प्रत्यक्षात आपल्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमतांचाही विकास करत असतात. नियमित खेळामुळे एकाग्रता, निर्णयक्षमता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

विशेष म्हणजे, जीवनातील अपयशाचा स्वीकार कसा करावा, पराभवातून शिकून पुन्हा नव्या जिद्दीने कसे उभे राहावे आणि विजय मिळाल्यानंतरही नम्र कसे राहावे, याचे संस्कार क्रीडांगणावरच घडतात. पुस्तकांमधून ज्ञान मिळते; परंतु जीवन जगण्याचे अनेक महत्त्वाचे धडे मैदान शिकवते.

क्रीडा क्षेत्रात सुवर्णसंधी आणि शासकीय पाठबळ

आज क्रीडा क्षेत्राकडे केवळ छंद किंवा मनोरंजन म्हणून पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सवलती आणि रोजगाराच्या संधींमुळे क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत.

शासकीय नियमानुसार पात्र आणि प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद आहे. तसेच पात्र क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमांनुसार शैक्षणिक सवलती आणि अतिरिक्त गुणांचा लाभ मिळू शकतो.

आज क्रीडा क्षेत्र केवळ खेळाडू होण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, फिटनेस ट्रेनर, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा पत्रकार, स्पोर्ट्स मॅनेजर, डेटा ॲनालिस्ट, पंच, क्रीडा समालोचक आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

मातीतील संस्कार आणि महाराष्ट्राची क्रीडा परंपरा

महाराष्ट्राला कुस्ती, खो-खो, कबड्डी, मल्लखांब आणि ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांची समृद्ध परंपरा लाभली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू खाशाबा जाधव यांनी महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले. त्यांचा संघर्ष, जिद्द आणि चिकाटी आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

ही क्रीडा परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी केवळ शासनाची किंवा क्रीडा शिक्षकांची नाही, तर पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन आणि समाजातील प्रत्येक घटकाची आहे.

क्रीडांगण ही केवळ खेळण्याची जागा नसून ती समता, बंधुता, नेतृत्व, संघभावना, शिस्त आणि सामाजिक संवादाची पहिली शाळा आहे. मैदानावर जात, धर्म, भाषा आणि आर्थिक परिस्थितीपेक्षा संघभावना व कौशल्याला अधिक महत्त्व असते. त्यामुळे खेळ विद्यार्थ्यांना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम करत नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणूनही घडवतो.

पालकांनी दृष्टिकोन बदलण्याची गरज

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे वाटते. मात्र, उज्ज्वल भविष्याचा अर्थ केवळ चांगले गुण आणि मोठी नोकरी एवढाच मर्यादित नसावा. निरोगी शरीर, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद हीदेखील यशस्वी जीवनाची महत्त्वाची सूत्रे आहेत.

म्हणूनच पालकांनी मुलांना अभ्यासासोबत दररोज मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शाळांनीही क्रीडा शिक्षणाला अभ्यासाइतकेच महत्त्व द्यावे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचा खेळ निवडण्याची आणि त्यामध्ये प्रगती करण्याची संधी मिळाली पाहिजे.

आज गरज आहे ती केवळ परीक्षेत अव्वल येणारे विद्यार्थी घडवण्याची नाही, तर शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या खंबीर, शिस्तप्रिय आणि संकटांवर मात करणारे नागरिक घडवण्याची!

कारण, पुस्तकातील ज्ञान माणसाला सुशिक्षित बनवते, तर क्रीडांगणावरील संस्कार त्याला सक्षम, आत्मविश्वासी आणि जिद्दी बनवतात.

चला तर मग, मुलांच्या हातातील मोबाईलचा अतिरेक कमी करून त्यांना मैदानाची वाट दाखवूया. गुणांच्या शर्यतीसोबतच गुणवत्तेची, आरोग्याची आणि क्रीडा संस्कृतीची नवी चळवळ उभी करूया.

“खेळेल महाराष्ट्र, घडेल महाराष्ट्र आणि जिंकेल महाराष्ट्र!”

Share.
Leave A Reply

Exit mobile version