Spread the love

माळेगावकरांचा संताप! दोन किलोमीटर पायपीट करूनही वेळेवर धान्य नाही; नवीन रेशन दुकानासाठी महिला रस्त्यावर उतरणार?

गावात ५०० ते ६०० लोकसंख्या, तरीही धान्यासाठी करावी लागते दीड ते दोन किलोमीटरची पायपीट; महात्मा फुले महिला बचत गटाची तहसीलदारांकडे मागणी

सोयगाव (प्रतिनिधी – शिवराम जाधव) : माळेगाव येथील नागरिकांना रेशनचे धान्य मिळविण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असून, एवढे अंतर पार करूनही वेळेवर धान्य मिळत नसल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सुमारे ५०० ते ६०० लोकसंख्या असतानाही एकाच रेशन दुकानावर अवलंबून राहावे लागत असल्याने महिला, वृद्ध आणि मजूर वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेशन दुकान एकच; नागरिकांची गैरसोय अनेक!

गावात एकच रेशन दुकान असल्याने सर्व कार्डधारकांना धान्यासाठी दूरवर जावे लागते. संबंधित दुकानदाराकडून वेळेवर धान्य मिळत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. उन्हातान्हात दुकानापर्यंत पोहोचूनही धान्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. हातात रेशन कार्ड असूनही हक्काचे धान्य वेळेवर मिळत नसल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

महात्मा फुले महिला बचत गटाची नवीन दुकानासाठी मागणी

या समस्येविरोधात माळेगाव येथील महिला बचत गटाने पुढाकार घेतला आहे. सुनिता शिवराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सोयगाव तहसीलदारांना निवेदन सादर केले.

महात्मा फुले महिला बचत गटाला गावात नवीन रेशन दुकान मंजूर करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक रेशनकार्डधारकाला शासनाच्या नियमांनुसार योग्य मापात आणि वेळेवर धान्य वितरित करण्याची ग्वाहीही बचत गटाने दिली आहे.

मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

माळेगावकरांच्या हक्काच्या धान्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी महिलांची भूमिका आहे. प्रशासनाने लवकर निर्णय घेतला नाही, तर गावातील महिला शांत बसणार नाहीत आणि पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता सोयगाव तहसील प्रशासन माळेगावकरांच्या या मागणीची दखल घेऊन नवीन रेशन दुकान मंजूर करण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांची गैरसोय दूर होणार की महिलांना आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version