खाई येथे सक्सेस मिशन ग्रुपचा शैक्षणिक उपक्रम उत्साहात!
विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ; तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मिळाला यशाचा मंत्र, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
धडगाव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती आणि शैक्षणिक प्रगतीची जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशाने दीपावली पर्वाचे औचित्य साधून खाई येथे सक्सेस मिशन ग्रुपच्या वतीने भव्य स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा उपक्रमांनी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सामान्य ज्ञान, वक्तृत्व, धावणे आणि चित्रकला स्पर्धा
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान (जी.के.) परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, धावण्याची स्पर्धा, तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या बुद्धिमत्तेचे, वक्तृत्व कौशल्याचे आणि कलागुणांचे दर्शन घडविले.
यावेळी गावातील नागरिकांच्या वतीने भजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक उपक्रमाला सांस्कृतिक वातावरणाचीही सुंदर जोड मिळाली.
तज्ज्ञांनी दिला यशाचा कानमंत्र
दुपारच्या सत्रात मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नंदुरबार येथील भामरे अकॅडमीचे संचालक युवराज भामरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यश संपादन करण्यासाठी योग्य नियोजन, ध्येय निश्चिती आणि प्रामाणिक अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेची जाणीव ठेवून ठरविलेल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
फॉरेस्ट गार्ड वसावे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. अडचणींवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाई गावाचे सरपंच संपत पाडवी होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कांतीलाल पाडवी यांनी केली, तर सूत्रसंचालन नानसिंग वसावे आणि खेमसिंग पाडवी यांनी केले. यावेळी डॉ. रमेश वसावे, सायसिंग पाडवी सर यांच्यासह सक्सेस मिशन ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. सक्सेस मिशन ग्रुपच्या वतीने उपस्थित पाहुणे, ग्रामस्थ आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्यातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचे काम या उपक्रमातून झाले. शिक्षणासोबतच विविध कला आणि कौशल्यांना प्रोत्साहन देणारा सक्सेस मिशन ग्रुपचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
