Spread the love

राष्ट्रीय खो-खोच्या सुवर्णमोहिमेसाठी महाराष्ट्र सज्ज!

४५ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; धाराशिवच्या जितेंद्र वसावे आणि सोलापूरच्या स्नेहा लामकाने यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

भडगाव (प्रतिनिधी – गणेश रावळ) : राष्ट्रीय खो-खोच्या मैदानावर महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवण्यासाठी राज्याचे कुमार आणि मुलींचे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. गुजरातमधील वडोदरा येथे २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान रंगणाऱ्या ४५ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले आहेत. कुमार गटाच्या कर्णधारपदाची जबाबदारी धाराशिवच्या जितेंद्र वसावे याच्याकडे, तर मुलींच्या संघाचे नेतृत्व सोलापूरच्या स्नेहा लामकाने हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धाराने महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत उतरणार आहेत.

अनुभवी नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सुवर्णमोहीम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी राज्याचे दोन्ही प्रातिनिधिक संघ जाहीर केले. संघनिवडीनंतर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

धाराशिव आणि सांगलीत रंगली पूर्वतयारीची रणधुमाळी

राष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मुलींचे प्रशिक्षण शिबिर धाराशिव येथे, तर कुमार संघाचे शिबिर सांगली येथे पार पडले.

तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी कसून सराव केला. शारीरिक तंदुरुस्ती, आक्रमण-बचावातील कौशल्य, वेग, चपळाई आणि सांघिक समन्वय यावर विशेष भर देण्यात आला. या प्रशिक्षणाचा फायदा राष्ट्रीय स्पर्धेत निश्चितच होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

जितेंद्र वसावेकडे कुमार संघाचे नेतृत्व

कुमार गटाच्या संघाचे नेतृत्व धाराशिवच्या जितेंद्र वसावे याच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील गुणवंत खेळाडूंचा समावेश असलेला महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

महाराष्ट्र कुमार संघ :

  • कर्णधार : जितेंद्र वसावे (धाराशिव)

  • हरदया वसावे, सोत्या वळवी (धाराशिव)

  • समर्थ सावंत, अर्जुन सेहजराव, सचिन सहानी (मुंबई उपनगर)

  • अकबर शेख, ओंकार राजपूत (सोलापूर)

  • समर्थ चव्हाण, अद्वैत बैत (पुणे)

  • पार्थ देवकते (सांगली)

  • तबरेज खान (सातारा)

  • विनायक भांगे, आशिष गौतम (ठाणे)

  • गौरव कुदळे (अहिल्यानगर)

राखीव खेळाडू : ओमकार सावंत (ठाणे), भीमसिंग वसावे (धाराशिव), सुबोध चव्हाण (पुणे).

प्रशिक्षक व व्यवस्थापन :

  • मुख्य प्रशिक्षक : पंढरीनाथ बडगुजर (धुळे)

  • सहाय्यक प्रशिक्षक : सुनील चव्हाण (सोलापूर)

  • व्यवस्थापक : मोहन राजपूत (सोलापूर)

स्नेहा लामकानेकडे मुलींच्या संघाची धुरा

मुलींच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोलापूरच्या स्नेहा लामकाने हिच्याकडे देण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांतील गुणवंत खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

महाराष्ट्र मुलींचा संघ :

  • कर्णधार : स्नेहा लामकाने (सोलापूर)

  • धनश्री तामखडे, वेदिका तामखडे, अनुष्का तामखडे (सांगली)

  • धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, गुड्डी राठोड (ठाणे)

  • मैथिली पवार (धाराशिव)

  • कल्याणी लामकाने, प्राजक्ता बनसोडे (सोलापूर)

  • श्वेता नवले, अपर्णा वर्धे (पुणे)

  • नंदिनी सिसोदीया (धुळे)

  • अक्षरा सोळंके (सातारा)

  • आर्या भाटकर (मुंबई उपनगर)

राखीव खेळाडू : जयश्री पवार (नाशिक), भवरम्मा उटगी (सांगली), स्वरांजली थोरात (धाराशिव).

प्रशिक्षक व व्यवस्थापन :

  • मुख्य प्रशिक्षक : अभिजित पाटील (धाराशिव)

  • सहाय्यक प्रशिक्षिका : सौ. समृद्धी पाटील (ठाणे)

  • व्यवस्थापिका : सौ. सुनिता राजपूत (सोलापूर)

सुवर्णपदकासाठी महाराष्ट्राचा निर्धार!

दोन्ही संघांच्या निवडीनंतर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. धाराशिव आणि सांगली येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरांत खेळाडूंनी चांगली तयारी केली असून प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा स्पर्धेत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

आता प्रतीक्षा आहे ती वडोदरा येथील प्रत्यक्ष मैदानावरील लढतींची! जिल्ह्याजिल्ह्यांतून निवडलेली गुणवत्ता, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कर्णधारांचे नेतृत्व यांच्या बळावर महाराष्ट्राचे कुमार आणि मुलींचे संघ राष्ट्रीय विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. दोन्ही संघांनी सुवर्णपदकाचा संकल्प पूर्ण करावा, अशी अपेक्षा राज्यातील क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version