Spread the love

लोकसहभागातून तेलखेडीच्या बारीपाड्यात वनराई बंधाऱ्याची निर्मिती!

ग्रामस्थांच्या एकजुटीतून जलसंवर्धनाचा उपक्रम; पशुधनासह नागरिकांनाही मिळणार पाण्याचा आधार, विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत

धडगाव (प्रतिनिधी) : परिसरात जाणवणारी दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन धडगाव तालुक्यातील तेलखेडी ग्रामपंचायतीच्या बारीपाडा येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे जलसंवर्धनाला चालना मिळाली आहे.

श्रमदानातून साकारला जलसंवर्धनाचा उपक्रम

या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान आणि सहकार्याच्या भावनेतून वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीत योगदान दिले. या बंधाऱ्यामुळे पावसाचे तसेच उपलब्ध पाणी अडवून परिसरात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत झाली आहे. परिणामी, मुक्या जनावरांसह स्थानिक नागरिकांनाही पाण्याचा आधार मिळणार आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या पशुधनाला या बंधाऱ्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

भूजलपातळी वाढण्यास मिळणार हातभार

बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्याचा जमिनीत नैसर्गिकरीत्या मुरवटा होऊन परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. भूजलपातळी टिकवून ठेवणे, पाण्याचे नैसर्गिक स्रोत बळकट करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या दृष्टीने अशा जलसंधारणाच्या उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.

ग्रामस्थांची एकजूट इतर गावांसाठी प्रेरणादायी

शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायत सदस्यांची दूरदृष्टी, ग्रामस्थांचे सहकार्य आणि श्रमदानाची भावना यांतून हा वनराई बंधारा साकारला आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावोगावी अशा उपक्रमांची गरज असून, तेलखेडीच्या बारीपाड्यातील हा प्रयत्न परिसरातील इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version