भगवान बिरसा मुंडा यांची जयंती लोककल्याणकारी उपक्रमांनी साजरी होणार!
११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; आदिवासी वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरे, शासकीय योजनांची माहिती आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
धुळे (प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती विविध लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याचा शासनाचा मानस आहे. आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात आदिवासी वस्त्यांमध्ये विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि विकासात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या लोककल्याणकारी सेवा सप्ताहाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मंजुळा गावित यांनी केले.
आरोग्यापासून महिला सक्षमीकरणापर्यंत विविध उपक्रम
या सप्ताहात आरोग्य तपासणी शिबिरे, विविध शासकीय योजनांची माहिती, महिला बचत गटांना प्रोत्साहन, युवक-युवतींच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन आणि कृषिपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच आदिवासी क्रांतिकारकांची स्मारके आणि पुतळ्यांची स्वच्छता, भव्य दीपोत्सव असे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
याशिवाय पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, समाजसेवक, बुद्धिजीवी आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सिकलसेल रुग्णांवर तातडीने उपचार
आरोग्य शिबिरांमध्ये सिकलसेल आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. त्यामुळे आरोग्य तपासणीबरोबरच आजाराचे निदान आणि उपचार यांनाही या सप्ताहात प्राधान्य दिले जाणार आहे.
साक्रीतून सप्ताहाची सुरुवात; १८ नोव्हेंबरला समारोप
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाची सुरुवात साक्री येथील आश्रमशाळेतून होणार असून, १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सप्ताहाचा समारोप होणार आहे. या कालावधीत विविध आदिवासी वस्त्यांमध्ये लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेला आमदार मंजुळा गावित, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
