Spread the love

भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र NQAS मूल्यांकनात जिल्ह्यात प्रथम

८७.६७ टक्के गुणांसह राष्ट्रीय स्तरावरील नामांकनासाठी पात्र; संपूर्ण आरोग्य पथकाच्या एकजुटीचे यश

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरावी अशी कामगिरी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडने केली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता हमी कार्यक्रम अर्थात NQAS (National Quality Assurance Standards) अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यांकनात पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राने ८७.६७ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र राष्ट्रीय स्तरावरील नामांकनासाठी पात्र ठरले आहे.

हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण आरोग्य पथकाच्या एकजुटीचे, अथक परिश्रमाचे आणि सेवाभावाचे फलित आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच आरोग्य केंद्रातील विविध सुविधांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात पिंपरखेडच्या पथकाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

स्वच्छता, औषध व्यवस्थापनापासून माता-बाल संगोपनापर्यंत गुणवत्तेचा ठसा

NQAS मूल्यांकनामध्ये रुग्णसेवा, स्वच्छता, औषध व्यवस्थापन, लसीकरण, माता-बाल संगोपन, प्रयोगशाळा सेवा, आरोग्यविषयक नोंदींची अचूकता, आपत्कालीन सेवा आणि रुग्णांशी असलेले आपुलकीचे नाते अशा विविध बाबींचे मूल्यांकन केले जाते. या प्रत्येक निकषावर पिंपरखेड आरोग्य केंद्राच्या पथकाने चांगली कामगिरी केली.

दिवस-रात्र रुग्णसेवेत कार्यरत असलेले तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहायिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी, परिचर, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थांचे सहकार्य या यशामागे महत्त्वाचे ठरले.

मार्गदर्शन आणि टीमवर्कमुळे यश

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक भोसले म्हणाले की, हे यश संपूर्ण टीमच्या एकजुटीचे, परिश्रमाचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र आता केवळ उपचारांचे ठिकाण न राहता विश्वास, गुणवत्ता आणि आपुलकीच्या आरोग्यसेवेचे केंद्र बनले आहे. या यशातून प्रेरणा घेऊन भविष्यातही अधिक दर्जेदार आणि रुग्णाभिमुख आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या संपूर्ण प्रक्रियेत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या यशामुळे भडगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रांसाठीही ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version