अमित भास्कर घायाळ यांना ‘महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान
सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव; साताऱ्यात राज्यस्तरीय सोहळ्यात सन्मान
मुंबई | प्रतिनिधी :
सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बीड जिल्ह्याचे सुपुत्र तथा युवा समाजसेवक अमित भास्कर घायाळ यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
अमित घायाळ हे शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, योग्य मार्गदर्शन आणि कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते विविध उपक्रम राबवित आहेत.
यासोबतच कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मदत, आर्थिक सहकार्य, मानसिक आधार देणे आणि कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही ते करीत आहेत.
‘ब्लू बर्ड फाउंडेशन’च्या माध्यमातून समाजसेवेचा वसा
‘ब्लू बर्ड फाउंडेशन’च्या माध्यमातून अमित घायाळ यांनी समाजातील गरजू घटकांना मदतीचा आधार देण्याचे काम सुरू ठेवले आहे. शैक्षणिक उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच गरजू व्यक्तींना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा’
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना अमित भास्कर घायाळ म्हणाले, “मी बीडचा आहे. येथूनच मानवता, निर्भीडपणा आणि धाडसाची शिकवण घेतली. संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आणि माझ्यासोबत कार्य करणाऱ्या टीमचा आहे.”
या पुरस्कारामुळे अमित घायाळ यांच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
