अजिंठा चौफुलीवर साकारणार ‘अजिंठा गेट’? सुशोभीकरणासाठी जयसिंग वाघ यांची संकल्पना!
पद्मपाणी बुद्धांची मूर्ती, अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे आणि माहिती फलक उभारण्याची मागणी; उपमहापौर मनोज चौधरी यांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीचे सुशोभीकरण करताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारे भव्य ‘अजिंठा गेट’ उभारण्यात यावे, अशी संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी मांडली आहे. यासंदर्भात अजिंठा हाउसिंग सोसायटीच्या वतीने उपमहापौर मनोज चौधरी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनासोबत जयसिंग वाघ यांच्या संकल्पनेतील संकल्पचित्रही सादर करण्यात आले. या प्रस्तावाला उपमहापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पद्मपाणी बुद्धांची मूर्ती, भित्तिचित्रे आणि माहिती फलकांची मागणी
अजिंठा चौफुलीच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक खर्चाला मंजुरी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चौफुलीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यामध्ये चौकातील सर्कलवर पद्मपाणी बुद्धांची मूर्ती बसविणे, रस्त्यावर अजिंठा गेटची प्रतिकृती उभारणे, सर्कलवर अजिंठा लेणीतील निवडक भित्तिचित्रे साकारण्याचा समावेश आहे.
तसेच आकाशवाणी चौक, जुना नेरी नाका आणि हॉटेल कमल पॅराडाईस येथून अजिंठा चौफुलीला जोडणाऱ्या रस्त्यांवर अजिंठा लेणीविषयी माहिती देणारे लोखंडी फलक लावावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
‘अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार’ म्हणून जळगावची ओळख अधिक ठळक होणार
या संकल्पनेविषयी माहिती देताना ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ म्हणाले की, जळगाव शहराची ओळख ‘सुवर्णनगरी’ (गोल्ड सिटी) आणि ‘केळीचे शहर’ (बनाना सिटी) अशी आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार म्हणूनही जळगावची ओळख आहे.
जळगाव शहरापासून अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर जागतिक कीर्तीची अजिंठा लेणी आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारे गेट, भित्तिचित्रे आणि मूर्ती अजिंठा चौफुलीवर साकारल्यास हा चौक शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ बनू शकतो. यामुळे जळगावच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच अजिंठा लेणीच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शनही नागरिकांना आणि पर्यटकांना घडेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे उपमहापौरांचे आश्वासन
जयसिंग वाघ यांनी सादर केलेले संकल्पचित्र पाहून उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात लवकरच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच या बैठकीस जयसिंग वाघ यांनाही निमंत्रित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ, अजिंठा हाउसिंग सोसायटीचे चेअरमन दिलीप सपकाळे, ॲड. आनंद कोचुरे, दिलीप तासखेडकर, अशोक सैंदाणे, नथू अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
