Spread the love

भुसावळ मुस्लिम समाजाची प्रेरणादायी पहल! जनाजासाठी आता स्वतःचे वाहन; खासगी वाहनांवरील अवलंबित्व संपणार

दोन महिन्यांच्या प्रयत्नांत २ लाख ४२ हजारांची वर्गणी; शकील भाईंनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत दिली गाडी, समाजाच्या एकजुटीतून सेवाभावी उपक्रम साकार

भुसावळ (प्रतिनिधी – प्रमोद पाटील) :

मृत्यूनंतर आपल्या प्रिय व्यक्तीचा जनाजा कब्रिस्तानपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्रॅक्टर किंवा अन्य खासगी वाहनांची व्यवस्था करण्याची वेळ आता भुसावळमधील मुस्लिम समाजावर येणार नाही. भुसावळ शहर मुस्लिम समाजाच्या वतीने समाजासाठी स्वतःचे जनाजा वाहन खरेदी करण्यात आले आहे. सामाजिक एकजूट, परस्पर सहकार्य आणि सेवाभावातून साकारलेल्या या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा रजा टॉवर चौकात उत्साहपूर्ण वातावरणात आणि दुआच्या उपस्थितीत पार पडला.

दुसऱ्यांच्या वाहनावरील अवलंबित्व संपविण्याचा निर्धार

या उपक्रमामागे संघर्ष, सहकार्य आणि जिद्दीची कहाणी आहे. सद्दाम हुसेन खाटीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी इलियास सर यांनी हज यात्रेला जाण्यापूर्वी रजा टॉवर ग्रुपला सेवेसाठी पिवळ्या रंगाची एक गाडी दिली होती. मात्र, हजवरून परतल्यानंतर गाडीतील काही कामे करायची असल्याचे सांगून ती परत घेण्यात आली.

पाच दिवसांनंतर गाडीबाबत विचारणा केली असता, ती कायमस्वरूपी चालक ठेवून चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच गाडीवर सद्दाम खाटीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक लावण्याबाबतही आक्षेप घेण्यात आला. या घडामोडींमुळे सहकाऱ्यांची निराशा झाली; मात्र त्यांनी माघार न घेता स्वतःचे वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

मित्रांची साथ; समाजाच्या नावाने वाहन घेण्याचा निर्णय

या निर्णयाला सईद ड्रायव्हर, मोहसिन काझी, फारूक आटा, जुनैद खान, बब्बू भाई सलमान, रमजान गवली, नवीद भाई, शोएब भाई, समीर भाई, शाकिर पिंजारी आणि अन्वर अन्ना यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला. दुसऱ्यांच्या वाहनावर अवलंबून राहण्याऐवजी ‘भुसावळ शहर मुस्लिम समाज’च्या नावाने स्वतःचे जनाजा वाहन खरेदी करावे, जेणेकरून ही सुविधा कायमस्वरूपी समाजासाठी उपलब्ध राहील, असा सामूहिक निर्णय घेण्यात आला.

दोन महिन्यांत जमविले २ लाख ४२ हजार रुपये

निर्णयानंतर सहकाऱ्यांनी शहरातील नागरिक आणि समाजातील जबाबदार व्यक्तींकडून आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन महिन्यांत जवळपास २ लाख ४२ हजार रुपये जमा झाले. वाहनाचा शोध घेण्यापासून ते आर्थिक मदत उभी करण्यापर्यंत अनेक अडचणी आल्या; मात्र सर्वांनी एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवले.

दरम्यान, जळगाव येथे शकील भाई यांच्याकडे एक वाहन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. बाजारात सुमारे पाच लाख रुपये किंमत असलेली ही गाडी त्यांनी समाजाच्या सेवाभावी उद्देशाची जाणीव ठेवून अवघ्या २ लाख २० हजार रुपयांत उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सहकार्यामुळे वाहन खरेदीचा मार्ग मोकळा झाला.

वाहन दुरुस्तीवर १९ हजार ४३५ रुपये खर्च

गाडी खरेदी केल्यानंतर ती सुस्थितीत आणण्यासाठी १९ हजार ४३५ रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये वायरिंग, डिझेल, इंजिन ऑइल, डेंटिंग, पेंटिंग, लाइट फिटिंग, रेडियम आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश आहे.

सद्दाम हुसेन खाटीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खर्चानंतर सध्या ३ हजार ३१५ रुपये शिल्लक असून, या रकमेतून वाहनासाठी नवीन बॅटरी खरेदी करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आणि शहरवासीयांचे त्यांनी आभार मानले. हे वाहन कोणत्याही एका व्यक्तीचे नसून संपूर्ण भुसावळ शहर मुस्लिम समाजाची अमानत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेक परिसरांतील नागरिकांना मिळणार सुविधा

या जनाजा वाहनाचा लाभ मुस्लिम कॉलनी, कंडारी, चाळी, झेड.टी.एस., साकरी, फेकरी तसेच भुसावळ शहरातील अन्य परिसरांतील नागरिकांना मिळणार आहे. प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर जनाजा कब्रिस्तानपर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची धावपळ यामुळे कमी होणार आहे.

भुसावळ शहर मुस्लिम समाजाचा हा उपक्रम केवळ वाहन खरेदीपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक एकजूट, परस्पर सहकार्य आणि मानवतेच्या भावनेचे प्रतीक ठरत आहे. समाजातील अनेक हात एकत्र आले, तर सामूहिक गरजांसाठी कायमस्वरूपी सुविधा उभारता येऊ शकते, याचा आदर्श या उपक्रमाने घालून दिला आहे. या सेवाभावी उपक्रमाचे भुसावळसह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version