Spread the love

बोदवडमध्ये गुंडगिरीविरोधात जनआक्रोश; पोलीस ठाण्यावर भव्य मूक मोर्चा!

व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; शहरातील कायदा-सुव्यवस्था राखून गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी

बोदवड, दि. १५ (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या गुंडगिरीच्या घटनांविरोधात अखेर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. व्यापारी, शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत आज बोदवड पोलीस ठाण्यावर भव्य मूक मोर्चा काढला. शहरातील बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणत गुंडगिरीला आळा घालावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ज्वेलर्ससमोरील मारहाणीच्या घटनेने संतापाची ठिणगी

दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री गांधी चौक परिसरातील अरिहंत ज्वेलर्ससमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. याप्रकरणी संदीप जवरी मिलांदे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपांनुसार, दगड, फरशीचे तुकडे, लोखंडी पाइप आणि लोखंडी बोळणीने मारहाण करण्यात आल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे शहरात तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच अवैध सावकारी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, धमकावणे, मारहाण आणि इतर कथित गैरप्रकारांबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

व्यापारी, शेतकरी आणि राजकीय पदाधिकारी एकवटले

या पार्श्वभूमीवर आज नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत बोदवड पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. मोर्चात व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील गुंडगिरीच्या घटनांवर कठोर नियंत्रण ठेवावे, नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे आणि संबंधित प्रकरणांमध्ये प्रभावी तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शहरातील नागरिकांची सुरक्षा हा केवळ एका घटनेपुरता मर्यादित विषय नसून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. गुन्हे दाखल होऊनही अशा घटनांना आळा बसत नसेल, तर नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कोणाकडे? असा सवाल या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला.

पोलीस प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

या मूक मोर्चानंतर पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, संबंधित प्रकरणातील तपासाला किती गती मिळते आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता बोदवडकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या या एकजुटीमुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version