आमदार राम भदाणेंसह किरण भामरेंची मैदानावर चौफेर फटकेबाजी!
मेहेरगावच्या मैदानावर ‘आमदार चषक’ची रंगत वाढली; उद्घाटनप्रसंगी दोन्ही नेत्यांनी फलंदाजीसह गोलंदाजीचाही घेतला आनंद
धुळे (प्रतिनिधी) :
ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रिकेटची मोठी आवड असून, त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध झाल्यास जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकण्याची संधी मिळू शकते. याच उद्देशाने मेहेरगाव येथे ‘आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ अर्थात ‘भव्य क्रिकेट महासंग्राम २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी आमदार राम भदाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी कृषी सभापती किरण भामरे यांनी मैदानात उतरून फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद घेतला. दोघांच्या चौफेर फटकेबाजीने उपस्थितांची मने जिंकली.
नेत्यांची फलंदाजी ठरली आकर्षण
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राम भदाणे आणि किरण भामरे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फलंदाजीसह गोलंदाजी केली. त्यांच्या फटकेबाजीला उपस्थित पदाधिकारी, खेळाडू आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. उद्घाटन सोहळ्यातील हा क्षण स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला.
खेळातून शिस्त आणि सांघिक भावना विकसित होते – आमदार भदाणे
यावेळी आमदार राम भदाणे म्हणाले की, खेळांमुळे शिस्त, सांघिक भावना आणि उत्तम आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. मोबाईलच्या व्यसनापासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी त्यांनी मैदानावर येऊन खेळांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात क्रीडासंस्कृती रुजावी आणि स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी अशा स्पर्धांना नेहमीच पाठबळ दिले जाईल. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मेहेरगाव येथे आयोजित या स्पर्धेला परिसरातील विविध संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मान्यवरांची उपस्थिती; आयोजकांचे परिश्रम
याप्रसंगी उपसरपंच दिनेश पाटील, किशोर शिंदे, राहुल भामरे, सुशील भामरे, योगेश भामरे, सुधाकर भामरे, कमलेश भामरे, माजी उपसरपंच रमेश भामरे, डीआरसीपी पब्लिक स्कूलचे चेअरमन दिलीप भामरे, अशोक भामरे, रावसाहेब भामरे, सयाजी देसले, दीपक भामरे, मनोज भामरे, भालचंद्र भामरे, दिग्विजय भामरे, निलेश भामरे, सुदर्शन भामरे, ललित भामरे, राकेश भामरे, भिकन भामरे, उमेश गोसावी, अमोल भामरे, समाधान भामरे, नितीन भामरे, भटू भामरे, किशोर भामरे, रवींद्र भामरे, नरेंद्र खैरनार, प्रवीण भामरे, जितेंद्र भामरे, शुभम भामरे, सतीश भामरे, कुणाल भामरे, सागर भामरे, नवलाने येथील ग्रामपंचायत सदस्य मयूर सूर्यवंशी, रघू सूर्यवंशी, राजू मालचे, राकेश पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी भूषण भामरे, सुमेश भामरे, सागर भामरे, धीरज भामरे, राजे ग्रुप आणि भगतसिंग मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
