दिवाळीत भुसावळ एसटी आगाराची ५१.८६ लाखांची कमाई; सणासुदीत ‘लालपरी’ला प्रवाशांची पसंती!
भाऊबीज आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी; चार दिवसांत ७३ हजार ९१६ किलोमीटरचा प्रवास
भुसावळ (प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे) :
दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त माहेरी जाणाऱ्या बहिणी, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेली कुटुंबे तसेच नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांनी एसटी बसला पसंती दिल्याने भुसावळ एसटी आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. १० ते १३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत भुसावळ आगाराच्या बसगाड्यांनी तब्बल ७३ हजार ९१६ किलोमीटरचा प्रवास करीत ५१ लाख ८६ हजार ३१२ रुपयांचे उत्पन्न मिळवले. सणासुदीच्या काळात आगाराने नोंदवलेली ही कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर भुसावळ बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांनी एसटीच्या सेवेला पहिली पसंती दिली. ग्रामीण भागाला जोडणारी, सुरक्षित आणि तुलनेने परवडणारी सेवा असल्याने ‘लालपरी’वरील प्रवाशांचा विश्वास कायम असल्याचे या उत्पन्नाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
चार दिवसांत दररोज सरासरी १२.९६ लाखांचे उत्पन्न
भुसावळ आगाराने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या चार दिवसांत विना-सवलत प्रवासातून २९ लाख ७३ हजार ६१३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रति किलोमीटर उत्पन्न (ईपीकेएम) ४०.२२ रुपये इतके राहिले. विविध प्रवासी सवलतींसह एकूण उत्पन्नाचा आकडा ५१ लाख ८६ हजार ३१२ रुपयांवर पोहोचला.
या कालावधीत बसगाड्यांनी दररोज सरासरी १८ हजार ४७९ किलोमीटरचा प्रवास केला, तर दररोजचे सरासरी उत्पन्न सुमारे १२ लाख ९६ हजार रुपये राहिले. सणासुदीच्या काळात प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद आणि बसगाड्यांचा वाढलेला वापर यामुळे आगाराच्या उत्पन्नाला चांगला हातभार लागला.
प्रवासी सवलतींचाही उत्पन्नवाढीत वाटा
महिला सन्मान योजनेसह शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेत मोठ्या संख्येने नागरिकांनी एसटीने प्रवास केला. प्रवाशांना सवलतींचा लाभ देतानाच आगाराच्या एकूण उत्पन्नातही वाढ झाली. त्यामुळे परवडणारा प्रवास आणि प्रवाशांचा विश्वास या दोन्ही बाबी एसटीसाठी फायदेशीर ठरत असल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले.
दिवाळीच्या गर्दीच्या काळात भुसावळ आगाराने केलेली ही उत्पन्नाची कामगिरी एसटी महामंडळाच्या सार्वजनिक वाहतूक सेवेवरील प्रवाशांचा विश्वास अधोरेखित करणारी ठरली आहे.
