Spread the love

जनजातीय गौरव सप्ताहानिमित्त विष्णापूर येथे भव्य महाशिबिर!

१२४ आदिवासी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित; महिला बचत गट, निराधार, दिव्यांग आणि शेतकऱ्यांना दिलासा

चोपडा (प्रतिनिधी – राहुल पाटील) :

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त देशभरात साजऱ्या होत असलेल्या ‘जनजातीय गौरव सप्ताहा’चे औचित्य साधून चोपडा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विष्णापूर येथे विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लाभ वितरण व जनजागृती महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील १२४ आदिवासी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि साहित्याचे वितरण करण्यात आले.

शासनाच्या कल्याणकारी योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविणे, योजनांविषयी जनजागृती करणे आणि विविध प्रशासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या महाशिबिराचा मुख्य उद्देश होता.

या महाशिबिरास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंजली बर्गे, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, भूमी अभिलेख उपअधीक्षक एम. पी. पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कुवर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, साबळे सर, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बोरअजंटीचे प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन, हातेड आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक संदीप पाटील, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील गावांचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षेला प्राधान्य

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी या शिबिरात ३० महिला बचत गटांना ‘राणी दुर्गावती महिला बचत गट प्रमाणपत्रे’ प्रदान करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत २४ लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे, १५ नवीन रेशनकार्ड, १० पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्रे, तर १० दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय महसूल विभागामार्फत आठ जातीचे दाखले आणि सहा उत्पन्नाचे दाखले लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला बचत गट, निराधार नागरिक, दिव्यांग बांधव आणि गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत झाली.

शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वितरण; आधुनिक शेतीला प्रोत्साहन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये १० शेतकऱ्यांना चारा बियाणे, १० शेतकऱ्यांना सुधारित मका बियाणे देण्यात आले. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत एका शेतकरी लाभार्थ्याला ट्रॅक्टरचलित धान्य मळणी यंत्र प्रदान करण्यात आले. या साहित्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली

महाशिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत समिती, भूमी अभिलेख आणि वन विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे आदिवासी बांधवांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत झाली. शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करीत प्रशासनाचे आभार मानले.

या महाशिबिराचे यशस्वी नियोजन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व संदीप पाटील, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विष्णापूरचे मुख्याध्यापक विनोद चांडोल, अधीक्षक भूषण सैंदाणे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. ए. पाटील सर यांनी केले, तर सहायक प्रकल्प अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल येथील संदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यासोबतच आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम जनजातीय गौरव सप्ताहाचे महत्त्वपूर्ण फलित ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version