‘आई’ राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेच्या परीक्षकपदी प्रा. डॉ. रामकृष्ण बदने!
संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम, शाल, पुष्पहार व चळवळीचे सन्मानपत्र देऊन गौरव
मुखेड (प्रतिनिधी) :
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘आई’ काव्यलेखन स्पर्धेच्या परीक्षकपदी माजी प्राचार्य तथा ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर येथील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. रामकृष्ण बदने सर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, अभ्यासपूर्ण लेखन आणि ‘आई’ या विषयावरील व्याख्यानांमुळे त्यांची साहित्यविश्वात विशेष ओळख आहे.
प्रा. डॉ. बदने यांनी ‘आई’ या विषयावर हजारो व्याख्याने दिली असून, पाचपेक्षा अधिक साहित्य संदर्भ पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्यांच्या सखोल अभ्यासाचा आणि समृद्ध साहित्यिक अनुभवाचा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील नवोदित कवींना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास आयोजक चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम देऊन सन्मान
या निमित्ताने परीक्षक प्रा. डॉ. रामकृष्ण बदने सर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम, शाल, पुष्पहार आणि चळवळीचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक योगदानाचा गौरव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’चे नांदेड जिल्हा सदस्य हरिश्चंद्र श्रीरामे तसेच महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख प्राचार्य संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर उपस्थित होते.
राज्यस्तरीय ‘आई’ काव्यलेखन स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच मातृत्वाच्या भावविश्वाला साहित्यिक अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात प्रा. डॉ. बदने यांची परीक्षक म्हणून असलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
