Spread the love

सोनगीर येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात!

आमदार राम भदाणे यांची प्रमुख उपस्थिती; आदिवासींच्या निवासी जागा सिटी सर्व्हेला नोंदविण्यासाठी लवकरच अध्यादेश काढण्याचा विश्वास

धुळे (प्रतिनिधी) : सोनगीर येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेल्या संघर्षाची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी माजी कृषी सभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम सर, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, सोनगीर शहराध्यक्ष साहेबराव माळी, प्रभारी सरपंच लखन ठेलारी, टेंबलायचे सरपंच मन्साराम मालचे, दापुरा सरपंच किशोर पाटील, माजी सरपंच रुखमाबाई ठाकरे, माजी उपसरपंच केदारेश्वर मोरे, धाकुशेठ बडगुजर, फागणे मंडळाचे तालुका उपाध्यक्ष पराग देशमुख, अण्णासाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित बागुल, नेहरू युवा मंडळाचे रविराज माळी, सावता ग्रुपचे अध्यक्ष भुरा माळी, ग्रामपंचायत सदस्य पिंटू भिल, राजू मालचे, लवा मास्टर, पिनू पवार, माजी सदस्य पुनीबाई भिल, संदीप गुजर, सुरेश जाधव, भीमा पवार, किशोर भिल आणि सुभाष भिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बिरसा मुंडा यांचे विचार आजही तरुणाईसाठी प्रेरणादायी!

आमदार राम भदाणे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. आदिवासी समाजाची अस्मिता, हक्क आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे विचार आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. या विचारांचा वारसा जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम सुरू ठेवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला सोनगीर परिसरातील ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते आणि महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार भदाणे यांनी गावकरी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. गावातील विविध प्रश्न, विकासकामे आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.

चौकट : आदिवासींच्या निवासी जागा सिटी सर्व्हेत नोंदविण्यासाठी पाठपुरावा!

आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे ज्या जागांवर वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहेत, त्या निवासी जागांची सिटी सर्व्हेमध्ये नोंद व्हावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. या जागा संबंधित रहिवाशांच्या नावे नोंदवून देण्याबाबत लवकरच अध्यादेश निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

— आमदार राम भदाणे, धुळे ग्रामीण

Share.
Leave A Reply

Exit mobile version