Spread the love

 

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीतील राजकीय घडामोडींना अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी निर्णायक वळण मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, तब्बल १२ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये महायुतीतील घटक पक्षांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

दुसरीकडे, आठ मतदारसंघांतील उर्वरित नऊ जागांसाठी आता प्रत्यक्ष निवडणूक रंगणार असल्याने जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष या लढतींकडे लागले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी माघारीनंतर निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. बिनविरोध झालेल्या १२ जागांमध्ये शिवसेनेने सहा, भाजपने चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर बाजी मारली आहे.

शिवसेनेचे सहा संचालक बिनविरोध

बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये शिवसेनेचे सहा उमेदवार आहेत. त्यात धरणगाव विकासो मतदारसंघातून गुलाबराव पाटील, अनुसूचित जमाती प्रवर्गातून चंद्रकांत सोनवणे, पाचोरा विकासो मतदारसंघातून सुमित पाटील, भडगावमधून सोमसिंग खुमानसिंग पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील आणि पारोळा मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील यांचा समावेश आहे.

भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार

भाजपकडून जामनेर विकासो मतदारसंघातून मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन, भुसावळमधून रजनी संजय सावकारे, चोपड्यातून रोहित दिलीप निकम आणि बोदवडमधून मधुकर रामचंद्र राणे हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमळनेर विकासो मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील आणि धरणगाव विकासो मतदारसंघातून सोनल संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नऊ जागांसाठी आठ मतदारसंघांत लढती

बिनविरोध निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आठ मतदारसंघांतील नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये मुक्ताईनगर, यावल, रावेर, चाळीसगाव, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि इतर सहकारी संस्था या मतदारसंघांचा समावेश आहे.

मुक्ताईनगर तालुका विकासो प्रतिनिधी मतदारसंघातून खासदार रक्षा निखिल खडसे आणि देवयानी चंद्रकांत देशमुख यांच्यात लढत होणार आहे.यावल तालुक्यात प्रशांत लिलाधर चौधरी, गणेश गिरधर नेहेते, रामदास गोंडू पाटील आणि विनोदकुमार पंडितराव पाटील हे चार उमेदवार रिंगणात आहेत.

रावेर तालुक्यात राजेंद्र पंढरीनाथ चौधरी, योगीराज गबाजी पाटील आणि रमेश नगराज पाटील यांच्यात लढत होणार आहे. चाळीसगाव तालुका विकासो प्रतिनिधी मतदारसंघात आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यासमोर नारायण नथू पाटील आणि विजय भिकनराव पाटील यांचे आव्हान आहे.महिला प्रतिनिधी मतदारसंघातील दोन जागांसाठी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे, ज्योती नाना पाटील, पुनम प्रशांत पाटील आणि सुलोचना भगवान पाटील या चार उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती असणार आहे.

इतर मागासवर्गीय प्रवर्गातून माजी मंत्री अनिल वसंत पाटील, सुनील प्रकाश देवरे, कुलभूषण वीरभाण पाटील आणि चंद्रकांत रामधन बाविस्कर हे चार उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातून अंबादास मधुकर गोसावी, काशिनाथ देवराम जावरे, सुरेश पुना धनके, मोरसिंग गोपा राठोड आणि विकास ज्ञानेश्वर वाघ हे पाच उमेदवार रिंगणात आहेत.तर इतर सहकारी संस्था मतदारसंघातून खिलचंद सुरेश इंगळे, प्रशांत लिलाधर चौधरी, विशाल गुलाबराव देवकर आणि विकास उखडू नारखेडे यांच्यात लढत रंगणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी बहुतांश जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग स्वीकारण्यात यश मिळवले असले, तरी उर्वरित जागांवरील लढती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः मुक्ताईनगरमधील खासदार रक्षा खडसे यांची लढत, ओबीसी मतदारसंघातील माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरील आव्हान आणि चाळीसगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक याकडे विशेष लक्ष लागले आहे.

माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय हालचालींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे स्वरूपच बदलले आहे. निम्म्याहून अधिक जागांवर बिनविरोध निवड झाल्याने आता उर्वरित नऊ जागांसाठी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेवरील वर्चस्वाच्या दृष्टीने या निवडणुकीतील निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version