Spread the love

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोवंश तस्करी, बोगस पावत्यांची उच्चस्तरीय चौकशी करा!

अवैध गोवंश व्यवहारांवर अद्याप गुन्हे का दाखल नाहीत? शिवसेना उबाठाचा सभापतींकडे जाब; आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा ‘टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा

धुळे (प्रतिनिधी) : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित गोवंश तस्करी, बोगस पावत्या, चोरीचे पशुधन, बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार, संघटित गुन्हेगारी आणि प्रशासकीय अनियमितता यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बाजार समितीचे सभापती योगेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. अधिकृत जनावरांचा बाजार बंद न करता शेतकरी, पशुपालक, व्यापारी, हमाल, मापाडी आणि कष्टकरी घटकांचे हित सुरक्षित ठेवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. मागण्यांवर आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास बाजार समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आणि ‘टाळे ठोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

२० मे २०२५ आणि ३ नोव्हेंबर २०२६ च्या घटनांची चौकशी करण्याची मागणी

निवेदनात नमूद केल्यानुसार, २० मे २०२५ रोजी बाजार समितीतील कथित गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी विद्यमान आमदार अनुपभैय्या अग्रवाल घटनास्थळी उपस्थित होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ८० ते १०० गोवंशीय जनावरांच्या जप्तीच्या कारवाईवेळी आमदारांचे समर्थक आणि गौरक्षक उपस्थित होते, असेही निवेदनात म्हटले आहे.

या दोन्ही घटनांनंतर बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाने स्वतःहून ठोस प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. गैरप्रकार उघड करण्यासाठी बाहेरील व्यक्तींना पुढाकार का घ्यावा लागतो? कथित तस्करीतील सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयत्न कोणाच्या दबावाखाली होत आहे का? या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट पणन मंत्री असून बहुतांश लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. बाजार समितीच्या कामकाजाबाबतही राजकीय नेतृत्वाचा प्रभाव असल्याचा उल्लेख करत, एवढ्या गंभीर घटनांनंतरही कारवाई होत नसल्याबद्दल शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. हिंदू रक्षक समितीसह विविध सामाजिक संस्थांनी संचालक मंडळाच्या भूमिकेबाबत केलेल्या आरोपांचाही अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बोगस पावत्या आणि चोरीच्या पशुधनाच्या व्यवहारांचा शोध घ्या

कथित गोवंश तस्करी, चोरीचे पशुधन, बोगस पावत्यांद्वारे जनावरांना वैध दाखविण्याचे प्रकार आणि गोमांस पुरवठ्याशी संबंधित व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. २० मे २०२५ आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या घटनांमधील जनावरांचे मूळ मालक, खरेदी-विक्रीच्या पावत्या, आर्थिक व्यवहार, वाहने, वाहतुकीचे मार्ग आणि संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा. बाजार समितीतील सीसीटीव्ही फुटेज, नोंदवही आणि इतर कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. आवश्यक असल्यास विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष गोवंश तस्करी, जनावरांची चोरी, बेकायदेशीर वाहतूक आणि अवैध पशुधन व्यवहार सहन करणार नाही. दोषी व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा प्रभावशाली असली, तरी तिच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका पक्षाने निवेदनातून मांडली आहे.

अधिकृत मंगळवारचा जनावरांचा बाजार सुरू ठेवण्याची मागणी

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना बाजारपेठ, योग्य भाव आणि पारदर्शक व्यवहार उपलब्ध करून देणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. या बाजारावर हजारो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र, कथित बेकायदेशीर व्यवहार, सुरक्षेचा अभाव, प्रशासकीय दुर्लक्ष आणि बाजारपेठेतील घटती आर्थिक उलाढाल यामुळे व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

काही व्यक्तींच्या कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण अधिकृत मंगळवारचा जनावरांचा बाजार बंद पडू नये. अवैध व्यवहारांवर कठोर कारवाई करताना शेतकरी, पशुपालक, व्यापारी, हमाल, मापाडी आणि वाहतूकदारांचे कायदेशीर हित व रोजगार सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करा

बाजारातील जनावरांची घटती आवक, आर्थिक उलाढाल, शेतकरी इतर बाजारपेठांकडे का वळत आहेत, खेडा व खासगी खरेदी-विक्री, वजनातील कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, असे निवेदनात नमूद आहे. बाजार समितीचे उत्पन्न-खर्च, परवाने आणि व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करून बाजारपेठेच्या पुनरुज्जीवनासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सुरक्षा आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी उपाययोजना

बाजार समिती परिसरातील चोरी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष, वाहन नोंदणी व्यवस्था, पुरेशी प्रकाशयोजना आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. संशयास्पद हालचालींवर कायदेशीर देखरेख ठेवून पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती, कामकाजाची नियमित तपासणी आणि पारदर्शक प्रशासनाची अंमलबजावणी करावी. कर्तव्यात कसूर, गैरहजेरी, आर्थिक अनियमितता किंवा बोगस पावत्यांना मदत केल्याचे आढळल्यास संबंधितांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करावी. राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय दुर्लक्षाच्या आरोपांचीही चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय बाजार समितीत स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाशव्यवस्था, पार्किंग आणि शेतमालाच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पारोळा रोड आणि बाजार समिती परिसरातील वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची वर्दळ आणि बेकायदेशीर पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती, महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त आराखडा राबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा ‘टाळे ठोको’ आंदोलन

बाजार समितीचे सभापती, सचिव आणि संचालक मंडळाने तातडीने विशेष बैठक घेऊन निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर कार्यवाही सुरू करावी. संबंधित पुरावे व कागदपत्रांसह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत शिफारस पाठवून संयुक्त प्रशासकीय व पोलीस कारवाईसाठी पाठपुरावा करावा. प्रत्येक मुद्द्याचा कृती अहवाल (ATR) तयार करून त्याची प्रत निवेदनकर्त्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन प्राप्त झाल्यापासून आठ दिवसांच्या आत लेखी खुलासा, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या शिफारशी आणि कालबद्ध कार्यवाही आराखडा सादर करावा. अन्यथा शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, पशुपालक आणि कष्टकरी घटकांना सोबत घेऊन बाजार समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन तसेच ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल. यासोबतच पालकमंत्री आणि संबंधित लोकप्रतिनिधींनाही जाब विचारण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

सभापती योगेश पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

शिवसेनेच्या मागण्यांवर बाजार समितीचे सभापती योगेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली. बाजार समितीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अनेक महत्त्वाच्या बाबींवर काम सुरू केले आहे. लवकरच बाजार समितीच्या प्रशासनात आणि कामकाजात आवश्यक बदल दिसून येतील, असे आश्वासन सभापती योगेश पाटील यांनी दिले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, धीरज पाटील, प्रशांत भदाणे, भरत मोरे, मनोज बंब, हेमराज पाटील, बाबाजी पाटील, आनंद जावडेकर, महिला आघाडीच्या संगीता जोशी, अरुणा मोरे, ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, गोकुळ बडगुजर, नितीन पाटील, प्रकाश वाघ, शिवाजी शिरसाळे, मनोज जाधव, कुणाल कानकाटे, योगेश पाटील, पंकज भारस्कर, सागर साळवे, दिनेश पाटील, निलेश कांजरेकर, सुनील चौधरी, गुलाब धोबी, संजय पाटील, संजय नत्थू पाटील, कपिल लिंगायत, डॉ. सुनील पाटील, बाळू शेंडगे, डॉ. सोमनाथ चौधरी, अमोल मोरे आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version