Spread the love

धुळ्यात दिव्यांग शिक्षकाचे बंद घर फोडले; ८० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास!

मिल्लत नगरमध्ये घरफोडी; कुटुंबीय बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांचा डल्ला, परिसरात हळहळ

धुळे (प्रतिनिधी) : धुळे शहरातील वडजाई रोड परिसरातील मिल्लत नगर येथे एका दिव्यांग शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. काझी नवीद असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या घरातून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांची रोकड आणि सात ते आठ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काझी नवीद हे १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान कुटुंबीयांसह आई-वडिलांना भेटण्यासाठी शिरपूर येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री नवीद कुटुंबीय घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कष्टाने कमावलेली रोकड आणि दागिने चोरीला गेल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एका दिव्यांग शिक्षकाच्या बंद घराला लक्ष्य करून चोरट्यांनी केलेल्या या चोरीमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिक्षक नवीद काजी यांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत शिक्षक नवीद काजी यांनी आपली व्यथा मांडली असून, कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना घरफोडी झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version