बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भुसावळात १२५ गरजूंना अन्नदान!
उमाकांत शर्मा यांच्या पुढाकारातून मोफत भोजन व दिवाळी फराळाचे वाटप; समाजसेवेतून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
भुसावळ (प्रतिनिधी : संघरत्न सपकाळे) : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी भुसावळ शहरात शिवसेनेचे उमाकांत शर्मा (नमा) यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील वरणगाव रोडवरील त्यांच्या शिवभोजन केंद्रात १२५ गरीब व गरजू नागरिकांना मोफत भोजन आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
सकाळी ११.३० वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरप्रमुख गणेश चौधरी आणि ज्येष्ठ शिवसैनिक शरद जैस्वाल यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘बाळासाहेब अमर रहे’ अशा भावपूर्ण घोषणा देत शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला.
उमाकांत शर्मा यांच्या शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून १२५ गरजू नागरिकांना भोजनासह दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी अन्नदानाचा उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ हा विचार आजही आचरणात
यावेळी मनोगत व्यक्त करताना उमाकांत शर्मा म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजकारणाची योग्य दिशा आणि मार्ग दाखवला आहे. त्याच मार्गावर चालत आजही समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांसाठी कार्य केले जात आहे. भविष्यातही समाजसेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवण्याचा संकल्प आहे. बाळासाहेबांसारखा देवमाणूस पुन्हा होणे शक्य नाही. ते प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात कायम आहेत. त्यांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार आम्ही आजही आचरणात आणत आहोत, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपशहरप्रमुख राकेश खरारे, ॲड. मिलिंद कापडे, अरुण साळुंखे, अन्सार शहा, पियुष शर्मा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर विभागप्रमुख अरुण साळुंखे यांनी केले.
