Spread the love

‘आई’ राज्यस्तरीय काव्यस्पर्धेच्या परीक्षकपदी प्रा. डॉ. रामकृष्ण बदने!

‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’कडून नियुक्तीपत्र प्रदान; ‘प्रबोधनरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम, शाल व सन्मानपत्र देऊन गौरव

पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर

‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘आई’ काव्यलेखन स्पर्धेच्या परीक्षकपदी माजी प्राचार्य तथा ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर येथील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सखोल अभ्यास तसेच ‘आई’ या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांचा व्यापक अनुभव लक्षात घेता, त्यांच्या मार्गदर्शनाचा राज्यभरातील नवोदित कवींना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

प्रा. डॉ. बदने यांनी ‘आई’ या विषयावर आतापर्यंत हजारो व्याख्याने दिली असून, पाचपेक्षा अधिक साहित्य संदर्भ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यिक जाणिवा, अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि अनुभवामुळे राज्यस्तरीय काव्यस्पर्धेच्या परीक्षणाला निश्चितच वेगळी उंची प्राप्त होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांना प्रतिष्ठेचा ‘प्रबोधनरत्न पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल चळवळीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम, शाल, पुष्पहार आणि चळवळीचे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याचवेळी राज्यस्तरीय ‘आई’ काव्यलेखन स्पर्धेच्या परीक्षकपदाचे अधिकृत नियुक्तीपत्रही त्यांना प्रदान करण्यात आले.

या गौरव सोहळ्याप्रसंगी चळवळीचे नांदेड जिल्हा सदस्य हरिश्चंद्र श्रीरामे आणि महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर उपस्थित होते. त्यांनी प्रा. डॉ. बदने यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version