बांबरुडचे सुनील पाटील ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित!
डॉ. सुभाष भामरे, अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान; सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा गौरव
भडगाव प्रतिनिधी | गणेश रावळ
वैचारिक स्वराज्य या संस्थेच्या वतीने आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात भडगाव तालुक्यातील बांबरुड येथील सुनील पाटील यांना त्यांच्या समाजसेवा, शैक्षणिक योगदान आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत प्रतिष्ठेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज डॉ. ह. भ. प. पुष्कर महाराज गोसावी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संत साहित्याचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य
सुनील पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्रातील विचार पोहोचविण्याचे कार्य केले आहे. संत साहित्य आणि विचारांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानले जाते.
समाजपरिवर्तनाचा ध्यास, शैक्षणिक योगदान आणि सेवाभावी वृत्ती या कार्याची दखल घेत त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सन्मानामुळे त्यांच्या आजवरच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे.
विचारांचा आणि सेवाव्रताचा सन्मान
‘सन्मान हा केवळ व्यक्तीचा नसतो, तर त्या व्यक्तीने आयुष्यभर जपलेल्या विचारांचा, मूल्यांचा आणि समाजसेवेच्या व्रताचा असतो,’ या भावनेतून सुनील पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराकडे पाहिले जात आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सन्मान बांबरुडसह भडगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.
