Spread the love

नव्या धान्याचा पहिला मान कोणीमातेला!

सातपुड्यात अन्नधान्याच्या समृद्धीसाठी पारंपरिक ‘आठीवटी’ पूजेला सुरुवात; कोणीमातेच्या पूजनातून सुख-समृद्धी, आरोग्य आणि पशुधनाच्या भरभराटीचे मागणे

धडगाव | प्रतिनिधी

सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांत निसर्गाशी नाते जपत आपली संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा अनमोल ठेवा जपणाऱ्या आदिवासी समाजात नवीन अन्नधान्याच्या स्वागतासाठी पारंपरिक ‘आठीवटी’ पूजेला सुरुवात झाली आहे. अस्तंबा ऋषीच्या यात्रेनंतर आणि दिवाळीच्या पर्वानंतर सातपुड्यातील आदिवासी बांधव कोणीमातेचे पूजन करून नवीन अन्नधान्याला पहिला मान देतात. वर्षभर घरात अन्नधान्याची भरभराट राहावी, कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, पशुधन सुखरूप राहावे आणि घरात सुख-समृद्धी नांदावी, या श्रद्धेतून ही पूजा केली जाते.

आदिवासी समाजाचे जीवन शेती आणि निसर्गाशी घट्ट जोडलेले आहे. पेरणीपासून पीक काढणीपर्यंत आणि नवीन धान्याचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी विविध धार्मिक विधी व परंपरा पाळल्या जातात. त्यामध्ये ‘नवाय’ आणि ‘आठीवटी’ या दोन पूजांना विशेष महत्त्व आहे. दसऱ्यापूर्वी साजरी होणारी ‘नवाय’ पूजा शेतातील नवीन भाजीपाला आणि पिकांचे सेवन करण्यापूर्वी केली जाते. तर पीक घरात आल्यानंतर नवीन अन्नधान्याच्या पूजनासाठी ‘आठीवटी’ची परंपरा पाळली जाते.

अस्तंबा ऋषीच्या शिखरावरील यात्रेवरून परतल्यानंतर आदिवासी कुटुंबे आपापल्या सोयीनुसार आठीवटी पूजेची तयारी करतात. गावातील कुटुंबांच्या सोयीने पूजेचे दिवस निश्चित केले जातात. ही पूजा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केली जाते. पूजेला बसणाऱ्या घरातील प्रमुख व्यक्तीला पाच ते सात दिवस धार्मिक नियम आणि पथ्यांचे पालन करावे लागते. त्यानंतर गावातील प्रमुख पुजारी किंवा पुजारी बाबांच्या हस्ते विधिवत पूजन केले जाते.

पूजासाहित्यातून दिसते निसर्गाशी असलेले नाते

आठीवटी पूजेसाठी साळ (तांदूळ), मका, ज्वारी, मोठी भेंडी, रोषा हे सुगंधित गवत, मुसड, सूप, महुआच्या फुलांपासून तयार केलेली दारू, डोवी, बेलाची पाने, पळसाची पाने, सुट्टे पैसे, बोत, नारळ आणि दिवा अशा विविध पारंपरिक साहित्याचा समावेश असतो. विशेष म्हणजे अस्तंबा यात्रेवरून आणलेल्या रोषा या सुगंधित गवताला पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच पूजेसाठी विहीर किंवा नदीतील नवीन आणि शुद्ध पाणी ठेवले जाते.

पूजेसाठी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रथम हात स्वच्छ धुवून हातात बेलाची पाने आणि डोवीतील फुलहार घेऊन देवाला पाती घ्यावी लागते. अशा प्रकारे पाच किंवा सात व्यक्तींचे पूजन पूर्ण झाल्यानंतर देवपूजा संपन्न होते. त्यानंतर देवता आणि धरतीमातेला वंदन करून वर्षभर पुरेसे अन्नधान्य मिळावे, कुटुंब निरोगी राहावे, धनसंपत्ती आणि पशुधनात वाढ व्हावी, अशी प्रार्थना केली जाते. पूजेनंतर देवदर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांना प्रसादरूपाने भोजन दिले जाते.

कुंडल येथे पारंपरिक आठीवटी पूजा उत्साहात

धडगाव तालुक्यातील कुंडल (गुगलमाळपाडा) येथे धरमसिंग इंद्या पाडवी यांच्या घरी पारंपरिक आठीवटी पूजा भक्तिभावाने संपन्न झाली. कुंडल येथील दौल्या बाबा पाडवी यांच्या हस्ते पूजेचे विधी पार पडले. यावेळी गावातील महिला, पुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पूजेत खेमसिंग वसावे, संजय पाडवी, बुरन्या पाडवी, सावन वसावे, मुकेश पाडवी, पत्रकार मंगेश वळवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

परंपरेतून निसर्गाप्रती कृतज्ञतेचा भाव

आधुनिकतेच्या प्रवाहातही सातपुड्यातील आदिवासी समाजाने पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरा आजही जिवंत ठेवल्या आहेत. आठीवटी पूजा हा केवळ धार्मिक विधी नसून शेती, अन्नधान्य, निसर्ग, धरतीमाता आणि सामूहिक जीवनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आदिवासी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

नवीन अन्नधान्याचे पूजन करून त्याचा पहिला मान कोणीमातेला देण्याच्या या परंपरेतून निसर्गाप्रती आदर आणि अन्नाच्या महत्त्वाची जाणीव व्यक्त होते. पुढील वर्षभर कुटुंबात अन्नधान्याची समृद्धी, आरोग्य आणि पशुधनाची भरभराट राहावी, हीच या परंपरेमागील श्रद्धा आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version