Spread the love

दिव्याने घेतला पेट; झोपडी जळून खाक!

कापूस, अन्नधान्य, रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी; माजी सरपंच शरद शिंदे यांच्याकडून पीडित कुटुंबाला १० हजारांची मदत

धुळे : झोपडीत लावलेल्या दिव्याने अचानक पेट घेतल्याने शेतातील झोपडी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कावठी येथे घडली. या आगीत सुखराम सुपडू भील यांच्या झोपडीतील कापूस, अन्नधान्य, रोख रक्कम तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे भील कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

आगीत संसाराची राखरांगोळी

झोपडीत लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीने काही वेळातच झोपडीला वेढा घातल्याने झोपडीतील साहित्य वाचविणे शक्य झाले नाही. कष्टाने साठवलेला कापूस, घरातील अन्नधान्य, रोख रक्कम आणि दैनंदिन वापरातील वस्तू आगीत जळून नष्ट झाल्या. या घटनेमुळे सुखराम भील यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

माजी सरपंचाकडून तातडीची मदत

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच कावठी येथील माजी सरपंच शरद शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी तातडीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देत संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या मदतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, आगीत झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version