Spread the love

बोदवड तालुक्यातील २० हजार २३ शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी मदत जमा!

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच मिळणार मदत; तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांचे आश्वासन

बोदवड, दि. १८ (प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या अग्रिम आर्थिक मदतीपैकी बोदवड तालुक्यातील आतापर्यंत २० हजार २३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत मदत जमा झाली आहे. मात्र, अद्यापही काही पात्र शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख अजय पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन दिले.

२० हजार २३ शेतकऱ्यांना मदतीचा लाभ

युवासेना तालुकाप्रमुख अजय पाटील, शिवसैनिक अमोल व्यवहारे, योगेश पाटील आणि केशव देशमुख यांनी तहसीलदारांची भेट घेऊन मदतीपासून वंचित असलेल्या पात्र शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी तालुक्यातील २० हजार २३ शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत आर्थिक मदत जमा झाल्याची माहिती दिली.

सामाईक सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक खातेदारांची नावे असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्र सादर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

९८ टक्के शेतकऱ्यांचे फार्मर आयडी पूर्ण

बोदवड तालुक्यातील सुमारे ९८ टक्के शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी येत्या सात ते आठ दिवसांत फार्मर आयडी तयार करून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदारांनी केले.

तसेच ई-केवायसी, फार्मर आयडी, ई-पीक पाहणी नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही ज्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदत जमा झालेली नाही, अशा प्रकरणांची तपासणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार सपकाळे यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन

सामाईक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक संमतीपत्र सादर करावे, तर फार्मर आयडी तयार न झालेल्या शेतकऱ्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे. पात्र असूनही आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ विनाविलंब मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version