Spread the love

जळगाव : महानगरपालिकेच्या वाहन विभागातील बंद आणि नादुरुस्त वाहनांमुळे नागरी सेवांवर परिणाम होऊ नये, यासाठी उपमहापौरांनी प्रशासनाला धारेवर धरले. बंद अवस्थेतील वाहनांची तातडीने दुरुस्ती करून ती पुन्हा सेवेत दाखल करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.महानगरपालिकेच्या वाहन विभागाचा दि. १८ नोव्हेंबर रोजी उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

यावेळी वाहन विभागप्रमुख संदीप मोरे, उपायुक्त निर्मला गायकवाळ, अग्निशमन विभागप्रमुख अश्वजित घरडे, भरत बारी, उपायुक्त पंकज गोसावी, सहाय्यक आयुक्त संजय राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत महापालिकेच्या वाहनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबी, रुग्णवाहिका, पोकलेन यांसह एकूण चार वाहने बंद अवस्थेत आहेत. याशिवाय काही वाहनांना किरकोळ, तर काहींना मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे समोर आले.

यावर उपमहापौरांनी नाराजी व्यक्त करत बंद वाहनांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. विशेषतः अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग आणि इतर अत्यावश्यक नागरी सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी. वाहनांच्या देखभालीतील त्रुटी दूर करून नियमित तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.महानगरपालिकेची वाहने ही शहरातील स्वच्छता, आरोग्य, आपत्कालीन मदत आणि दैनंदिन नागरी सुविधांचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यामुळे केवळ दुरुस्ती किंवा देखभालीअभावी कोणतेही वाहन दीर्घकाळ बंद राहणे योग्य नाही. वाहनांच्या अनुपलब्धतेमुळे नागरिकांच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी, असेही उपमहापौरांनी स्पष्ट केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version