Spread the love

पिंपरी : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील तब्बल १६ हजार महिला व तरुणींना वर्षभरात ५७ विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे, या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च महापालिका करणार असून, त्यासाठीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. १८) अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत महिलांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासह शहरातील विविध विकासकामे, रस्ते देखभाल, स्वच्छता आणि रुग्णालयांशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

महिला सक्षमीकरण व सबलीकरण योजनेंतर्गत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेमार्फत वर्षभर हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यामध्ये अकाउंट्स, फॅशन डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, ब्युटी अँड वेलनेस, फूड प्रोसेसिंग, माहिती तंत्रज्ञान, डेटा ॲनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, केटरिंग यांसह पारंपरिक कला आणि सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.प्रशिक्षणासाठी प्रतिविद्यार्थिनी किमान ११ हजार २५ रुपये, तर कमाल ३२ हजार ११९ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क महापालिकेकडून संबंधित प्रशिक्षण संस्थेला अदा केले जाणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे प्रशिक्षणापासून वंचित राहणाऱ्या महिलांनाही कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

महिला बचतगटांनाही कामाची संधी

शहरातील झोपडपट्टी परिसरात सेवाशुल्क बिलांचे वाटप करणे आणि नागरिकांची माहिती मोबाईल ॲपद्वारे अद्ययावत करण्याची जबाबदारी महिला बचतगटांमार्फत पार पाडली जाणार आहे. या कामासाठी प्रत्येक बिलामागे २५ रुपये शुल्क दिले जाणार आहे. त्यामुळे महिला बचतगटांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होणार आहे.

रस्ते, स्वच्छता आणि रुग्णालयांच्या कामांनाही मंजुरी

स्थायी समितीच्या बैठकीत दिघी-आळंदी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटर, सबवे व उड्डाणपूल, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल तसेच नाशिक फाटा ते वाकड मार्गावरील विविध बांधकामांच्या रेलिंग, पावसाळी जलवाहिन्या आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. रस्ते दुभाजकांची देखभाल व सुशोभीकरण, एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दैनंदिन साफसफाई आणि नेहरूनगर येथील नवीन न्यायालय परिसराच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी पुरविण्याच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली.

याशिवाय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विविध विभागांसाठी कॉटरी मशीन खरेदी, रुग्णालयाची रंगरंगोटी आणि भोसरी रुग्णालयातील स्थापत्यविषयक दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानातील राष्ट्रध्वज फडकविणे, संचलन, देखभाल आणि संबंधित यंत्रणेच्या दुरुस्तीचाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षणातील यशाबद्दल आयुक्तांचा गौरव

दरम्यान, केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाल्याबद्दल स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या हस्ते आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगर सचिव उल्हास जगताप, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, स्थायी समितीचे सदस्य, विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version