Spread the love

महाराष्ट्रातील 9 जिल्हे व 5 राज्यांतील 76 कुमारवयीन मुला-मुलींचा सहभाग; विविध जीवनोपयोगी विषयांवर मार्गदर्शन

भुसावळ संघरत्न सपकाळे –

तालखेडा,ता. मुक्ताईनगर : श्री. रुद्र वेलफेअर फाऊंडेशन, नागपूर आणि मानवता सेवा संस्था, तालखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘सृजन-5’ हे राज्यस्तरीय निवासी शिबिर 13 ते 17 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मानवता फार्म, तालखेडा येथे उत्साहपूर्ण व आनंदपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

ग्रामीण भागातील 13 ते 18 वयोगटातील गरजू, होतकरू आणि क्षमतासंपन्न कुमारवयीन मुला-मुलींना त्यांच्या सुप्त गुणांची जाणीव करून देत, त्यांना आत्मविश्वासपूर्ण, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी समृद्ध संधी व अर्थपूर्ण अनुभव उपलब्ध करून देण्याचे नियोजनबद्ध कार्य ‘सृजन’ या उपक्रमाच्या माध्यमातून केले जाते.

यावर्षी ‘सृजन-5’ शिबिरासाठी महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांसह एकूण 5 राज्यांतील 76 शिबिरार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विविध बौद्धिक सत्रे, गटकार्य, क्षेत्रभेटी, गटचर्चा, पत्रलेखन, अर्थपूर्ण आंतरक्रिया, प्रकल्प, श्रमकार्य, समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या भेटी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, खेळ, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून शिबिरार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने अनेक जीवनोपयोगी गोष्टी आत्मसात केल्या.

शिबिरामध्ये स्व-जाणीव, कुटुंबाचे महत्त्व, विश्वाच्या निर्मितीची गोष्ट, अवकाश निरीक्षण, करिअर मार्गदर्शन, आहार व आरोग्य, योगासने, व्यायाम व ध्यान, आनापान,लैंगिक शिक्षण, POCSO कायदा व स्पर्शाचे प्रकार, सर्वधर्म प्रार्थना, कुमारवयीन मुला-मुलींमधील आत्महत्येचे प्रश्न, सामूहिक प्रभाव, ताण-तणावाचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, वाचन संस्कृती, पर्यावरण संरक्षण, संविधानातील मूल्ये, दैनंदिन जीवनातील संवादकलेचे महत्त्व, सुलेखन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकांसाठी विशेष समुपदेशन सत्राचे आयोजनही करण्यात आले होते.

‘सृजन’चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिबिर संपले तरी शिबिरार्थ्यांशी असलेले नाते संपत नाही. केवळ पाच दिवसांचे निवासी शिबिर आयोजित करून न थांबता, प्रत्येक शिबिरार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याच्या शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक गरजा समजून घेतल्या जातात. त्यानंतरही त्यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन, सहकार्य आणि आधार देणारी ‘सपोर्ट सिस्टीम’ म्हणून ‘सृजन’ सातत्याने कार्यरत राहते. त्यामुळे शिबिर हा केवळ पाच दिवसांचा अनुभव नसून अर्थपूर्ण आयुष्याच्या दिशेने सुरू झालेला एक दीर्घकालीन प्रवास आहे.

‘सृजन-5’ शिबिर यशस्वी करण्यासाठी ‘टीम सृजन’ आणि ‘टीम सृजनमित्र’मधील सदस्यांनी नियोजनपूर्वक व अथक परिश्रम घेतले. विविध मान्यवर, तज्ज्ञ, स्वयंसेवक, देणगीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version