Spread the love

शायना एनसी यांच्या पोस्टरला जोडे मारत फाडले; धुळ्यात ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन!

बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याचा आरोप; महाराणा प्रताप चौकात शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी

धुळे (प्रतिनिधी) : मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने धुळ्यात आक्रमक आंदोलन केले. महाराणा प्रताप चौकात शायना एनसी यांच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर फाडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

बाळासाहेबांच्या छायाचित्राच्या अवमानावरून संताप

मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी एका विषयासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत विवादित पुस्तक फाडण्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत शिंदे गटाविरोधात आंदोलने करण्यात आली.

महाराणा प्रताप चौकात पोस्टर फाडून निषेध

धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयातून शायना एनसी यांचे पोस्टर घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाराणा प्रताप चौकात दाखल झाले. याठिकाणी पोस्टरला जोडे मारून आणि पोस्टर फाडून घटनेचा निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच या प्रकरणावरून गर्भित इशाराही देण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि प्रतिमेचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. या आंदोलनामुळे महाराणा प्रताप चौकातील राजकीय वातावरण तापले.

ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख निंबा मराठे, महानगरप्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, नरेंद्र परदेशी, संदीप सूर्यवंशी, संदीप चौधरी, कुणाल कानकाटे, प्रभा परदेशी, संगीता जोशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version