Spread the love

नशिराबादमध्ये सोयाबीनच्या सहा गोण्यांची चोरी; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण!

कमी पावसामुळे आधीच उत्पादनात घट; घराच्या आवारातून शेतमाल लंपास, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद शहरात चोरट्यांनी आता शेतमालालाही लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जितेंद्र सिताराम पाटील यांच्या घराच्या आवारात ठेवलेल्या सोयाबीनच्या सहा गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही बाब लक्षात येताच पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेतली असून, चोरीचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गुणवंत देशमुख आणि पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. चोरी झालेल्या सोयाबीनच्या गोण्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

आधीच उत्पादन घटले; त्यात शेतमाल चोरीची भर

यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आधीच मोठी घट झाली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीने पिकविलेल्या शेतमालाची चोरी होणे ही अधिक चिंतेची बाब ठरली आहे. शेतीतील वाढता खर्च, कमी उत्पादन आणि बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता घराच्या आवारात ठेवलेला शेतमालही सुरक्षित राहील का, अशी चिंता सतावत आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नुकसान होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने शेतमाल चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, चोरी झालेल्या सोयाबीनच्या सहा गोण्यांचा लवकरात लवकर शोध लागावा आणि संबंधित चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version