Spread the love

कुत्र्यांच्या हल्ल्यात नीलगायीचे पाडस गंभीर जखमी; उपचारानंतर जंगलात सुखरूप मुक्त!

पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार; डॉ. दीपक लोखंडे यांनी जखमेवर घातले टाके

जळगाव (प्रतिनिधी) : कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नीलगायीच्या पाडसाला वेळीच पशुवैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर या पाडसाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास इंगळे आणि डॉ. दीपक लोखंडे यांनी तत्परतेने उपचार केल्याने वन्यजीवाला जीवदान मिळाले.

१८ नोव्हेंबर रोजी चंदन पाटील यांच्या शेतात नीलगायीच्या पाडसावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पाडसाच्या मागील पायाला गंभीर दुखापत झाली. पाडस जखमी झाल्याचे लक्षात येताच चंदन पाटील यांनी तातडीने पशुमित्र रुपेश माळी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच वनविभागाचे अधिकारी कोळी साहेब यांनाही याबाबत कळविण्यात आले.

पशुवैद्यकीय पथकाकडून तातडीने उपचार

घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास इंगळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पाडसाची वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपक लोखंडे यांनी पाडसाच्या जखमेवर टाके घालून आवश्यक उपचार केले. त्यानंतर डॉ. विकास इंगळे यांनी पुढील वैद्यकीय उपचार केले.

वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने नीलगायीच्या पाडसाची प्रकृती सुधारण्यास मदत झाली. उपचार पूर्ण झाल्यानंतर पाडसाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सोडण्यात आले.

तत्परतेमुळे वन्यजीवाला जीवदान

जखमी वन्यजीवाला मदत करण्यासाठी चंदन पाटील, पशुमित्र रुपेश माळी, वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दाखविलेली तत्परता महत्त्वपूर्ण ठरली. वेळेत उपचार आणि समन्वय साधल्यामुळे नीलगायीच्या पाडसाचा जीव वाचविण्यात यश आले. या घटनेतून वन्यजीव संकटात सापडल्यास तातडीने वनविभाग आणि पशुवैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version