संविधान सन्मान महासभेसाठी धुळे-जळगाव जिल्हा सज्ज!
हजारो कार्यकर्ते मुंबईत सहभागी होणार; संयुक्त बैठकीत १ लाख ३२ हजारांचा निधी जाहीर – दिपक डोके
धुळे (प्रतिनिधी) : मुंबईतील शिवाजी पार्क येथे २५ नोव्हेंबर २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणारी ‘संविधान सन्मान महासभा’ यशस्वी करण्यासाठी धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत तयारीला वेग आला आहे. या महासभेसाठी दोन्ही जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि समाजबांधव मुंबईत सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, महासभेच्या नियोजनासाठी झालेल्या संयुक्त बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १ लाख ३२ हजार रुपयांचा निधी जाहीर केला.
धुळे येथे संयुक्त आढावा बैठक
संविधान सन्मान महासभेच्या पूर्वतयारीसाठी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी धुळे येथील शासकीय विश्रामगृहावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे-जळगाव जिल्ह्याची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धुळे-जळगाव जिल्हा प्रभारी दिपक डोके उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दिपक डोके म्हणाले की, संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, लोकशाही मूल्ये आणि मतदानाचा अधिकार अबाधित राखणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण आणि संविधानाचा सन्मान यासाठी २५ नोव्हेंबरची महासभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे धुळे-जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावातून आणि तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधवांनी मुंबईत उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
महासभेसाठी १ लाख ३२ हजारांचा निधी जाहीर
महासभेच्या आयोजनासाठी निधी संकलनाची माहिती देताना दिपक डोके यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे-जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीतच १ लाख ३२ हजार रुपयांचा निधी जाहीर केला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बैठकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गावोगावी जनजागृती आणि वाहन व्यवस्थेचे नियोजन
महासभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविण्याच्या दृष्टीने वाहन व्यवस्था, तालुकास्तरीय आढावा बैठका, गावोगावी जनजागृती, समाजबांधवांशी संपर्क आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाचे नियोजन यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुका आणि गावाने स्वतंत्र जबाबदारी स्वीकारून महासभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांना मुंबईत आणण्याच्या सूचना दिपक डोके यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
धुळे-जळगावमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या संयुक्त बैठकीस धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, धुळे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम वाघ, आकाश बागुल, शंकर खरात, मुकुंद माणिक, चंद्रमणी वाघ, दिलीप बोरसे, पैलवान किरण मोरे, इक्बाल तेली, शिंदखेडा तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, साक्री तालुकाध्यक्ष नितीन मोहिते, शिरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, धुळे तालुकाध्यक्ष अमोल पवार, राहुल पाटोळे, जळगाव युवक अध्यक्ष बाळा पवार, सम्यक विद्यार्थी आघाडीचे राज्य प्रवक्ते रामराजे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि धुळे-जळगाव जिल्ह्यांतील विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या महासभेसाठी धुळे-जळगाव जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
