Spread the love

महापौरांच्या उपोषणाची प्रशासनाकडून तात्काळ दखल; अवैध कत्तलखाने पाडण्यास सुरुवात!

पोलिसांकडून शहरातील अवैध धंदे बंद असल्याची ग्वाही; मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर महापौर मायादेवी परदेशी यांचे उपोषण तूर्तास स्थगित

धुळे : शहरातील अवैध कत्तलखाने, अवैध व्यवसाय, शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई आणि बाजार समिती परिसरातील गोवंशाची सुटका आदी विविध मागण्यांसाठी महापौर मायादेवी परदेशी यांनी क्युमन क्लब येथे उपोषण सुरू केले. महापौरांनी उपोषणाला सुरुवात करताच प्रशासनाने तातडीने दखल घेत अवैध कत्तलखाने पाडण्याची कारवाई सुरू केली. तसेच शहरात अवैध धंदे सुरू नसल्याची ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर महापौरांनी उपोषण तूर्तास स्थगित केले.

शहरातील विविध प्रश्नांवर महापौरांनी यापूर्वीच प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, मागण्यांबाबत अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. क्युमन क्लब येथे उपोषण सुरू होताच संबंधित प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. महापालिकेच्या वतीने शहरातील अवैध कत्तलखाने पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, शहरातील अवैध व्यवसायांबाबत पोलीस प्रशासनाने महापौरांना ग्वाही दिली की, शहरात अवैध धंदे सुरू नाहीत. तसेच महापौरांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्रही देण्यात आले. या आश्वासनांनंतर मायादेवी परदेशी यांनी उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

अवैध धंदे आढळल्यास नागरिकांनी माहिती द्यावी

शहरात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाला त्याची माहिती द्यावी, असे आवाहन महापौर मायादेवी परदेशी यांनी धुळेकरांना केले आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आणि अवैध कत्तलखाने व व्यवसायांवर कारवाई सातत्याने सुरू राहते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version