Spread the love

विधान परिषदेसह महामंडळांमध्ये पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पाच राज्यांत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वबळाचा इशारा; अजितदादा प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचेही समर्थन

पालघर : भाजपसोबतच्या राजकीय मैत्रीला महायुतीचे स्वरूप प्राप्त होण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा महत्त्वाचा वाटा असल्याचा दावा करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीला ‘महायुती’ हे नाव आरपीआयमुळे मिळाले, मात्र सत्तेतील वाटा आणि पदवाटपाच्या वेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विधान परिषदेची जागा आणि विविध महामंडळांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आरपीआय (आठवले गट)चे राष्ट्रीय नेते दिवंगत सुरेश बारशिंग यांच्या निधनानंतर पालघर येथे पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी पक्षाची राजकीय भूमिका आणि आगामी निवडणुकांमधील रणनीती स्पष्ट केली.देशातील पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरपीआयची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे सांगताना आठवले म्हणाले की, या राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाची चांगली ताकद आहे. मात्र, भाजप आणि स्थानिक मित्रपक्षांकडून अपेक्षित जागा मिळत नसल्याची खंत आहे.

सन्मानपूर्वक जागावाटप झाले नाही, तर आरपीआय स्वबळावर निवडणूक लढविण्याचा पर्याय स्वीकारेल. आमचा पक्ष भाजप किंवा मित्रपक्षांची काही टक्के मते कमी करण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे भाजपची मते विभागली जाऊ नयेत, यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत समन्वयाने राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी बजावले.राज्यातील सत्तेत आरपीआयचा अधिक वाटा मिळावा, या प्रश्नावर आठवले यांनी पक्षाच्या संघटनात्मक योगदानाचा मुद्दा उपस्थित केला. भाजपकडून माझ्याकडे लक्ष दिले जाते; मात्र माझ्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

कारण त्यांच्या पाठबळामुळेच मी राजकीयदृष्ट्या मोठा झालो आहे, असे ते म्हणाले. विधान परिषदेची जागा तसेच विविध महामंडळांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्यांनी सकारात्मक शब्द दिल्याचेही आठवले यांनी सांगितले.विशेष म्हणजे, पूर्वी काँग्रेससोबत असताना आरपीआयला अधिक जागा मिळत होत्या, अशी आठवण करून देत त्यांनी महायुतीतील सत्तावाटपावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. केवळ भाजपच्या वाट्यावरील नव्हे, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील महामंडळे व लाभाची पदेही आरपीआयला मिळावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महायुतीच्या नावाचे श्रेयही आरपीआयला!

भाजपसोबत जाण्यामागे पक्षाच्या राजकीय आणि संघटनात्मक विस्ताराचा विचार असल्याचे सांगताना आठवले म्हणाले की, कोणत्याही पक्षाची वाढ होण्यासाठी त्याचा सत्तेत सहभाग असणे आवश्यक असते. याच भूमिकेतून आरपीआय भाजपसोबत आला. आमच्या पाठिंब्यामुळेच या युतीला ‘महायुती’ हे नाव मिळाले. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नंतर भाजपसोबत आले; त्याआधीपासून आरपीआय भाजपसोबत होता, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रात आरपीआय महायुतीचा घटक असला, तरी देशपातळीवर भाजपसोबत अशीच युती नाही. त्यामुळे आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार भाजप आणि संबंधित पक्षांकडे जागांची मागणी केली जाईल. अपेक्षित सन्मान आणि जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजितदादा प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी

पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी अजितदादा प्रकरणासंदर्भात केलेल्या आरोपांबाबतही आठवले यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. या प्रकरणात योग्य तो तपास झाला पाहिजे. रोहित पवार यांनी एफआयआर दाखल करण्याची जी मागणी केली आहे, तिला आमच्या पक्षाचा पाठिंबा असून या प्रकरणात एफआयआर दाखल झालाच पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.

दरम्यान, दिवंगत सुरेश बारशिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित शोकसभेत आठवले यांनी त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पालघर आणि बारशिंग यांच्यातील घट्ट नाते अधोरेखित करत त्यांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली.

नाराजीचा सूर; पण बंडाचे संकेत नाहीत!

महायुतीतील सत्तावाटप, विधान परिषद आणि महामंडळांमधील नियुक्त्या या मुद्द्यांवर आठवले यांनी भाजपकडे अपेक्षा व्यक्त केल्या असल्या, तरी त्यांच्या भूमिकेतून महायुतीपासून फारकत घेण्याचे ठोस संकेत मिळालेले नाहीत. पदाधिकाऱ्यांना सत्तेतील संधी मिळावी, यासाठी दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्ष आरपीआयच्या मागण्यांना कितपत प्रतिसाद देतात आणि आठवले यांच्या नाराजीचा महायुतीच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version